नव्या पिढीने तडजोड केल्यास लग्न लवकर जुळून येतील:मराठा मंडळ व पाटील सेवा समितीतर्फे परिचय मेळावा
पूर्वी सोयरीक संबंध जुळवणारी यंत्रणा मध्यस्थीच्या रूपाने समाजामध्ये कार्यरत होती. आज मात्र लग्न जुळवणे ही जटिल समस्या झाली आहे. नव्या पिढीने तडजोड केली तर लग्न लवकर जुळून येतील असे प्रतिपादन मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रणजित सपकाळ यांनी केले. अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपकाळ बोलत होते. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी होते मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, देविदास कोरपे, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर पाटील, सचिव प्रा. विवेक हिवरे, कोषाध्यक्ष डॉ. विनोद बोर्डे, सहसचिव श्रीकांत पागृत, कार्यकारिणी सदस्य अनिल राऊत, डॉ. विनीत हिंगणकर, प्रा. जयश्री बंड, श्रद्धा मोरे उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकृष्ण विखे यांनी केले. पाटील बहुउद्देशीय सेवा समितीने गत पंचवीस वर्षात राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचा आढावा त्यांनी मांडला. मराठा मंडळाचे सचिव प्रा. विवेक हिवरे यांनी मराठा मंडळ समाजाच्या उत्थानासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. जयश्री बंड व श्रद्धा मोरे यांनी परिचय पत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन ज्योती इंगळे यांनी केले. समाजाला विधायक रचनात्मक दिशा देण्यासाठी मराठा मंडळाची निर्मिती झाली. मंडळाचा हा समाजसेवेचा वसा आणि वारसा सर्वांच्या सहयोगाने पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले. शेतीला पूरक जोडधंदे आवश्यक भुईभार पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी मराठा मंडळाची स्थापना केली. समाजाच्या सर्वंकष विकासासाठी मंडळाने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अकोल्यात वसतीगृह सुरू केले. सामूहिक विवाहाची परंपरा सुरू केली. पाटील सेवा समिती परिचय मेळाव्याचे आयोजन २५ वर्षापासून सातत्याने करत आहे. समाजाने लग्न, तेराव्यावर अवास्तव खर्च न करता शिक्षण आणि उद्योगावर करावा. शेतीला पूरक जोडधंदे सुरू करण्याचे, आवाहन भुईभार यांनी केले.