काही चुकीचे केले असेल तर राजीनामा द्यायला तयार:जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार?, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर निशाणा

राज्यात सध्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये मतभेद सुरू आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनामधील काही नेते व मंत्री नाराज आहेत. शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या रायगड येथे पालकमंत्री पदासाठीची नावे स्थगित करण्यात आली आहेत. आमदार भरत गोगावले यांनी झेंडावंदनावरून झालेल्या वादावर भाष्य करताना म्हटले आहे की, जर मी काही चुकीचे केले असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. भरत गोगावले म्हणाले, जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार? आव्हान स्वीकारून चालतो तोच यशस्वी होतो. पुढे ते म्हणाले की, मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात. दरम्यान, आमदार महेंद्र दळवी यांनीही सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे होत्या. त्यांना वैतागून रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी उठाव केला आणि त्यानंतर गुवाहाटीचे लोण संपूर्ण राज्यात पसरले. त्यामुळेच राज्यात सत्ता बदल घडून आला. महेंद्र दळवी पुढे म्हणाले, सत्ता बदल होऊनही सुनील तटकरे यांनी महायुती सरकारमध्ये मागच्या दाराने प्रवेश केला. त्यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवले, पण पालकमंत्री मात्र उदय सामंत होते. आता पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला पालकमंत्रीपद मिळवून दिले. त्यांच्याकडे नेमकी काय जादू आहे, हे आम्हाला कळत नाही. आम्ही भरत गोगावले यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी फायनल केले होते, पण रात्रीतून ते कसे बदलले, याचा आम्हाला प्रश्न आहे.

Share