‘पढेंगे तो बढेंगे’ हेच कॉंग्रेसचे धोरण:मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ला सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘बटेंगे तो कटेंगे‘ ही घोषणा सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यापुढे जाऊन ‘एक है तो सेफ है‘ असा नारा दिला आहे. याला काँग्रेसचे नेते आणि खासदार सचिन पायलट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘पढेंगे तो बढेंगे’ हे काँग्रेसचे धोरण असून आम्ही ते आधीपासूनच अंमलात आणीत असल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले. विदर्भातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायलट आज नागपूला आले होते. यावेळी त्यांनी “बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा मतदारांना अप्रत्यक्षपणे धमकावणारी आणि भीता दाखवणारी असल्याचा आरोप केला. भाजप नेहमीच दिशाभूल करते, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत असते. निवडणूक आली की अशाच जातीय व धार्मिक मुद्यांवर जोर दिला जातो. दहा वर्षांत काय विकास कामे केली हे ते सांगत नाहीत. भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब आणि श्रीमंतांच्या दरीत प्रचंड वाढ झाली आहे. ते फक्त श्रीमंत आणि उद्योगपतीसाठीच काम करतात आणि योजना राबवतात असा आरोप पायलट यांनी केला. फक्त निवडणुकीत कल्याणकारी घोषणा करतात. महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. लोकसभेत मोठा फटका बसल्या नंतर त्यांनी लाडकी बहिण योजना आणली. आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगत आहे. मात्र सत्तेत असतान या सर्व गोष्टी का केल्या नाहीत याचे उत्तर भाजपचे नेते देत नसल्याचेही पायलट म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार चांगले आहेत. त्यांचे वर्तनही चांगले आहे. काँग्रेसचे घोषणापत्र काही चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या आम्ही सत्ता आल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये घोषणापत्रानुसार सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कल्याणकारी राज्याची आमची संकल्पना आहे. त्यामुळे गोरगरीबांना काही लाभ द्यावे लागतातच. त्यामुळे या योजनांना रेवडी म्हणणे अयोग्य असल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले.

Share