बांगलादेशमध्ये मंदिरे जळाली, मूर्ती भंगल्या; हिंदूंमध्ये भीती…:चटगांवमध्ये जिथे हिंदूंवर हल्ले तेथे भास्करने वास्तव जाणून घेतले…

मी बांगलादेशातील चटगांव येथे आहे. ठिकाण आहे, मेथोरपट्टी. येथे हिंदू लोक राहतात. २६ नोव्हेंबर रोजी या वस्तीवर जमावाने हल्ला केला होता. वस्तीत प्रवेश करताच तुम्हाला जळालेली घरे दिसू लागतात. थोडे पुढे गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. गोपाळ मंदिर आणि शारदा मंदिर. गोपाळ मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती भंगली आहे. शारदा मंदिराचीही तीच अवस्था. एका कोपऱ्यात जळालेली पुस्तके व तुटलेल्या वस्तू आहेत. धर्मगुरू चिन्मय दास यांच्या अटकेनंतर चटगांवमध्ये हिंसाचार उसळला होता. यानंतर हिंदूंवर हल्ले सुरू झाले. हल्ल्याच्या वृत्तानंतर दैनिक भास्कर चटगांवला पोहोचले आहे. येथील हिंदू लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. मेथोरपट्टी येथे राहणाऱ्या सुमीच्या मुलाला २७ नोव्हेंबरच्या रात्री लष्करी जवानांनी घरातून नेले. सुमी रडत रडत म्हणते, ‘माझ्या पोरांना घराबाहेर काढले होते. पोलिस ठाण्यात गेल्यावर मुलांना भेटू दिले जात नाही. आज १५ दिवस झाले आहेत. पोलिसांना सांगा आम्हाला गोळ्या घाला. स्वातंत्र्य स्तंभ, येथून हिंसाचार सुरू चटगांवचा न्यू मार्केट हा गजबजलेला परिसर आहे. येथे चौकाच्या मध्यभागी स्वातंत्र्य स्तंभ आहे. त्यावर बांगलादेशचा राष्ट्रध्वज फडकत आहे. २५ नोव्हेंबर रोजी काही लोकांनी या ध्वजावर भगवा झेंडा लावला. त्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडले. पोलिसांनी चिन्मय प्रभूसह १९ जणांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर बांगलादेशमध्ये इस्कॉनविरोधात हालचाली सुरू झाल्या. २६ नोव्हेंबर रोजी चिन्मय प्रभूंना चटगांव कोर्टात हजर केले. हिंसाचार सुरू झाला व सैफुल नावाचा एक वकील ठार झाला. यानंतर जमावाने हिंदूंवर हल्ले करण्यास सुरुवात केली. २६ नोव्हेंबर , ठिकाण : कोर्ट इमारत चटगांवच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी चिन्मय प्रभूंचा जामीन अर्ज फेटाळला. नंतर चिन्मय यांच्या वकिलांनी दुपारी १ वाजता चटगांव सत्र न्यायालयात धाव घेतली. तेव्हा कोर्टात हजर वकील कपिलुद्दीन म्हणाले, न्यायाधीशांनी जामिनास नकार दिला. काही समर्थकांनी वाहने जाळली. त्याविरुद्ध काही वकील मार्च काढत होते. दुसऱ्या बाजूने चिन्मय यांचे समर्थक होते. रस्त्यात ॲडव्होकेट सैफुल इस्लाम यांची हत्या करण्यात आली. सैफुल यांच्या हत्येप्रकरणात मेथोरपट्टीतून ८ जणांना अटक झाली. पुढे जमावाने मंदिरांची तोडफोड केली. २८ नोव्हेंबर , ठिकाण : इस्कॉन मंदिर चटगांवमध्ये उभारलेल्या तीन इस्कॉन मंदिरावर जमावाने हल्ला केला होता. येथे आम्ही सर्वात आधी पुंडरीक धामला गेलो. चिन्मय प्रभू यांच्या माता व बहिणी येथेच राहतात. एक पुजारी म्हणाले, चिन्मय यांना दोन मोठे भाऊ व एक बहीण आहे. त्यांची आई आयुर्वेदिक डाॅक्टर तर वडील प्राचार्य होते. चिन्मय यांच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. चिन्मय २३ वर्षांचे होते. तेव्हा २००८ मध्ये पुंडरिक धामचे ते अध्यक्ष झाले होते. पुजारी म्हणाले, काही लोक चिन्मय यांची ईर्ष्या करतात. खोटे आरोप करतात. २५ नोव्हेंबर, ठिकाण : न्यू मार्केट न्यू मार्केटमध्ये ‘फुलकोली’ नावाचे दुकान आहे. त्याचे व्यवस्थापक झेंडा फडकवण्याचे साक्षीदार आहेत. भीतीमुळे ते कॅमेऱ्यासमोर येऊ इच्छित नाहीत. फुलकोलीच्या शेजारी मोहंमद दिलावर हुसैन यांचे दुकान आहे. हुसैन म्हणाले, त्या दिवशी ७०-८० लोक जमले होते. ते आपसात बोलले. सायंकाळी ५ किंवा ६ वाजता त्यापैकी काही लोक स्मारकावर चढले. भगवा ध्वज लावला. ते खूप संख्येने होते. त्यामुळे त्यांना कुणी रोखू शकले नाही. मी रात्री १० वाजेपर्यंत येथे होतो. तोपर्यंत झेंडा लावला होता. २६ नोव्हेंबर, ठिकाण: मेथोरपट्टी या भागात सर्व हिंदू आहे. भारताच्या फाळणीपासून त्यांची कुटुंबे बांगलादेशात राहत आहेत. येथे राहणारे विष्णू दास सांगतात की, दुपारी चारच्या सुमारास जमाव आमच्या कॉलनीत घुसला. ते आमची मंदिरे उद्ध्वस्त करत होते. हे बघून आम्ही घरात शिरलो. २६ नोव्हेंबरपूर्वी येथे कधीही दंगल झाली नव्हती. पुढच्या शुक्रवारीही काही लोक आले. त्यांनी तोडफोड केली. रेश्मा म्हणते की आता तिला घराबाहेर पडण्याची भीती वाटते. जेव्हा मी बाहेर असते तेव्हा मला मुलांची काळजी वाटते. २५ नोव्हेंबर, ठिकाण: लाल दिघी मैदान चटगांव हिंसाचाराचे एक टोक लाल दिघी मैदानाला जोडते. बांगलादेशच्या राजकारणात या मैदानाला विशेष स्थान आहे. १९८८ मध्ये अवामी लीगच्या अध्यक्षा शेख हसीना यांनी याच मैदानात सभा घेतली होती. इथे पोहोचल्यावर ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची छाप दिसली. याच मैदानात २५ नोव्हेंबरला हिंदू संघटनांचा कार्यक्रम होता. जो ‘बांगलादेश सम्मिलित संखलघु जोत’ या बॅनरखाली झाला. डॉ. कुशल बरन चक्रवर्ती सांगतात की चिन्मय प्रभू सभेला आले व ५० मिनिटे भाषण केले.

Share