बांगलादेशात कट्टरवाद्यांचा हिंदूंच्या घरांवर हल्ले:200 कुटुंबे पळाली, ईशनिंदेच्या आरोपात हिंदू तरुणाला अटक
बांगलादेशातील युनूस सरकारच्या दाव्यानंतरही हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबत नाहीत. सुमनगंज जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा कट्टरवाद्यांच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर हल्ला केला. एका हिंदू तरुणाने फेसबुक पोस्टमध्ये ईशनिंदा केल्याचा आरोप जमावाने केला आहे. उपद्रवींनी हिंदूंच्या १०० घरांची तोडफोड केली. घरातील देव्हारे पाडण्यात आले. हिंदूंच्या दुकानातही लूटमार झाली. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा सर्व २०० हिंदू कुटुंबे पळून गेली. पोलिसांनी आकाश दास (२०, रा. मंगलारगाव, सुमनगंज) याला ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुमनगंजमध्ये बुधवारी निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. मंगळवार येथील हिंदू कुटुंबे ढोलपुशी येथील नातेवाइकांच्या घरी आश्रयाला गेले. सुमनने (नाव बदलले) फोनवर सांगितले की, येथे हल्ल्याचा धोका असल्याने आम्ही घरातून बाहेर पडतच नाही. बाहेरचे असल्याने गावकरी आम्हाला सहज ओळखतील आणि कट्टरवाद्यांना माहिती देतील. दरम्यान, हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन कौन्सिलचे सरचिटणीस मणिंद्रनाथ यांनी प्रश्न केला की, पोलिसांनी ईशनिंदा करणाऱ्या आरोपींना पकडले आहे तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले का केले जात आहेत?
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार : शेख हसीना माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी युनूस सरकारवर अल्पसंख्याकांचा विशेषत: हिंदूंचा जाणीवपूर्वक नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. ५ ऑगस्टपासून भारतात निर्वासित असलेल्या हसीना यांनी बुधवारी आपल्या पहिल्या जाहीर वक्तव्यात म्हटले की, युनूस सरकारला मला व बहीण रेहानाला मारायचे आहे. बांगलादेशच्या विजय दिनानिमित्त न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात आभासी भाषणात त्या म्हणाल्या, मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नव्हे तर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी देश सोडला. युनूस सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देताना अनिवार्य सुरक्षा तपासणी रद्द केली आहे. हसीना सरकारने २०१९ मध्ये ही अनिवार्यता लागू केली होती. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत अहमद मारूफ यांनी बुधवारी बांगलादेशचे हवाई वाहतूक मंत्री हसन आरिफ यांची भेट घेतली.