हिंगोली जिल्ह्यात जेष्ठ व दिव्यांगांच्या गृह मतदानाला सुरवात:1052 जणांनी दिले होते अर्ज, घरातच उभे केले मतदान केंद्र
हिंगोली जिल्हयात विधानसभा निवडणुकीत जेष्ठ नागरीक व दिव्यांगाच्या गृह मतदानाला शनिवारी ता. ९ सुरवात झाली असून १०५२ जणांचे मतदान घेतले जात आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करून टपाली मतदान घेतले जात आहे. रविवारी ता. १० मतदान प्रक्रिया पूर्ण करून मतदानाची पाकिटे निवडणुक विभागाकडे जमा केली जाणार आहे. हिंगोली जिल्हयात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघात निवडणुक होत आहे. या निवडणुकीत दिव्यांग व ८५ वर्षपेक्षा अधिक वयोगटातील मतदारांची संख्या सुमारे २१ हजार ३५३ एवढी आहे. यामध्ये दिव्यांग मतदार व जेष्ठ नागरीकांनी गृह मतदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हयातील १०५२ जणांनी निवडणुक विभागाकडे अर्ज सादर केले होते. दरम्यान, त्यानुसार शनिवारी ता. ९ सकाळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या सूचनेनंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानासाठी पथके रवाना करण्यात आली होती. या पथकासोबत मतदारांचा पत्ता व त्यांचे अर्ज सोबत देऊन टपाली मतपत्रिका देखील देण्यात आली आहे. सकाळपासून तीनही विधानसभा मतदार संघात शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातून पथकांनी दिव्यांग व जेष्ठ नागरीकांकडे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडली. यामध्ये त्यांच्या घरातच मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या मतदारांना सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मतदान केले. त्यानंतर मतदानाची पाकिटे निवडणुक विभागाकडे जमा करण्यात आली आहे. रविवारी ता. १० दिवसभर मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे निवडणुक विभागाच्या सुत्रांनी सांगितले.