मुस्लिम बहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात:तिथे EVM मविआसाठीच कशी काय सेट होते?, सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल

विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण झाले असून ईव्हीएम घोटाळा झाला. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यात वेगळा निकाल लागला, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला. या आरोपावरून सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांना उलटा सवाल केला आहे. मुस्लिमबहुल भागात मुस्लिम बहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात. तिथे ईव्हीएम मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित करत तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन केले. पुण्यातील फुले वाडा येथे हे आंदोलन करण्यात आले. शनिवारी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे.. पैसे वाटप करणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचे बाबा आढाव म्हणाले होते. काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडिया पोस्ट करत बाबा आढाव यांच्या प्रश्नांवर प्रतिप्रश्न केला. बाबा आढाव साहेब सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी.मुस्लिम बहुल भागात EVM मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे ‘सेटिंग’ का होत नाही?असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत, असे ते म्हणाले. जनतेचा कौल पचवता आला नाही की, अशा आरोपांचा आधार घेतला जातो. विज्ञान युगात अशा निराधार आरोपांनी लोकशाहीची विश्वासार्हता कमी होत नाही, तर आरोप करणाऱ्यांची होत असते, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. काँग्रेसला निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच शंका
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले. काँग्रेसने तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. शरद पवारांनाही ईव्हीएमवर संशय
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम कसे सेट केले जाते, याचे प्रझेंटेशन काही लोकांनी आम्हाला दिले. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल, असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता त्यात तथ्य दिसत आहे. राज्यातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. पण त्यातून काही साध्य होईल का? याविषयी मला शंका वाटते.

Share