सराफा दुकानातून 2 मिनिटांत अर्धा किलो सोने घेऊन दरोडेखोर पसार:संगमनेरच्या साकूर गावातील घटना, ताेंडाला रुमाल लावून आले 5 जण

तालुक्यातील साकुर येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील कान्हा ज्वेलर्स या दुकानात सशस्त्र दरोडेखोरांनी दराेडा टाकत २.२० मिनिटांत सोन्याचे दागिने लुटून नेले. सुमारे ६३० ग्रॅम सोने व काही राेख रक्कम पळवली. दराेडेखाेरांनी दुकानातील दाेन व्यक्तींवर पिस्तूल राेखले. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली अाहे. या सोन्याची किंमत सुमारे ५० लाख असल्याचे समजते. दोन दुचाकींवर ५ जण ताेंडाला रुमाल बांधून सराफ दुकानात घुसले. या वेळी मालक सुभाष लोळगे यांचा मुलगा संकेत व एक ग्राहक दुकानात हाेता. दरोडेखोरांनी ग्राहकाला दुकानातील बाकड्यावर व संकेतला काउंटरच्या खाली बसवले. अवघ्या २ मिनिटे २० सेकंदांत दुकानातील साेन्याचे दागिने एकत्र करून पळ काढला. यावेळी संकेतचा मोबाइल दरोडेखोरांनी साेबत नेला. दुकानातून बाहेर आल्यानंतर रिव्हाॅल्व्हरमधून हवेत फैरी झाडून दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी वेगाने तपास करीत आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी पेट्रोल पंपावर घातला होता दरोडा, अडीच लाख लुटले गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला साकूर येथील भगवान पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून अडीच लाख रुपये लुटले होते. मात्र, तीनच दिवसांत सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. राहुरी- नेवासे भागातील आरोपी होते, अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक माऊली खेमनर यांनी दिली आहे. दरोडेखोरांची लुटण्याची घाई, ग्राहक तंबाखू चोळण्यात व्यग्र ग्राहकाला बाजूला सारून दरोडेखोर सोन्याचे दागिने लुटत होते. २ मिनिटे २० सेकंदापर्यंत हा प्रकार सुरू होता. ग्राहक दुकानातील खुर्चीवर बसून होता. दरोडेखोरांनी दागिन्यांची जमवाजमव करेपर्यंत त्या ग्राहकाने खिशातून तंबाखू, चुना काढला व चोळून तोंडात टाकत तो दुकानाबाहेर निघून गेला. ८ दिवसांपूर्वी दोघाकंडून रेकी दिवाळी सणानिमित्ताने २०० ग्रॅम सोने क्रेडिटवर घेतले होते. माझे बंधू संकेत याने बाइकवरून आलेल्या दोन जणांना आठ दिवसांपूर्वी आमच्या दुकानात बघितले होते. मात्र त्यांनी चेहरा झाकलेला होता. यातील आरोपी अगोदर रेकी करून गेले असल्याचा संशय येत आहे, अशी माहिती कान्हा ज्वेलर्सचे निखिल लोळगे यांनी दिली. ताेंडाला रुमाल लावून आलेल्या दरोडेखोरांनी २.२० मिनिटांत सर्व माल गोळा करून सॅकमध्ये भरला. त्यानंतर दुकानाबाहेर आल्यानंतर बंदुकीतून हवेत गोळीबार करीत हे पाचही दरोडेखोर पसार झाले. टॉवर लोकेशनवरून पोलिसांनी माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी रस्त्यातच माेबाइल फेकून दिला. मांडवे फाटा- खडकवाडी रस्त्यावर येथील गावातील काही लोकांनी दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला या वेळीही त्यांनी पुन्हा हवेत गोळीबार केला.

Share