बोलठाण आरोग्य उपकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर:माजी खासदार समीर‎भुजबळ यांची माहिती‎

जातेगाव घाटमाथ्यावरील बोलठाण आरोग्य उपकेंद्राचा दर्जा वाढून ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करू. त्यामुळे घाटमाथ्यावरील रुग्णांना दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. रस्त्याच्या सुविधा निर्माण केल्या जातील. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने मराठवाडा व नांदगाव तालुक्याशी संपर्क करणे सोपे जाईल, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. जातेगाव, बोलठाण, गोंडेगाव, जवळकी, रोहिले या गावांचा दौरा केल्यानंतर जातेगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. बोलठाणला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असून तेथे शेतीमालाची आवक-जावक चांगली आहे. तसेच खेड्यांसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबवून जल शुद्धीकरण केंद्रामार्फत शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे महिलांची कसरत थांबेल, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, जातेगाव येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. वाय. पी. जाधव, विजय पाटील, राजेंद्र नहार, नारायण पवार, भगवान सोनवणे, अमित नहार, समाधान पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौंदाणे गटातील विविध गावांना समीर भुजबळ यांनी भेटी दिल्या.

Share