मविआच्या जाहिरनाम्यात खोटी आश्वासने:अर्जुन खोतकर यांचा दावा; राज्यात सहकार अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती
आघाडी सरकार राज्यात सत्तेत येणार नाही. त्यामुळे ते कोणतेही खोटे आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यातून देत आहेत. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफी बाबत त्यांनी महायुती सरकारच्या योजनांवर सुरवातीला टीका केली. पण आता त्यांनी या योजना स्वीकारल्याचे दिसून येते, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. केंद्र सरकारने माजी मंत्री जयंत पाटील यांच्या राजाराम साखर कारखान्यास १४४२ कोटी रुपयांची मदत केली. ही बाब आम्ही बोलून दाखवल्यामुळे ती त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत. राज्यात सहकार अधिक समृध्द व्हावा यासाठी आम्ही दहा हजार कोटीचा आयकर माफ केला आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, भाजपने निवडणुकीसाठी ‘संकल्प पत्र’ हा जाहीरनामा जनतेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सादर केला आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजप जनतेला कामाचे वचन देऊन त्याची पूर्तता सत्ता आल्यावर करते. देशहित, नागरिक हीत समोर ठेऊन आम्ही काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात जाहिरनामा मधील अनेक गुंतागुंतीचे विषय मार्गी लावले आहेत. आज राज्यात महायुती सत्तेत काम करत आहे. राज्यातील विकासाला चालना देण्यासाठी , शेतकरी – महिला यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात आलेली आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही कशाप्रकारे विकास करणार आहोत त्याची माहिती आमच्या जाहिरनाम्याद्वारे देण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, धार्मिक आस्था जपणे, सामाजिक जीवनमान उंचावणे या गोष्टीना प्राधान्य दिले. राज्याला गतिमान करतानाचा रोड मॅप यामध्यमातून मांडण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या ८ हजार २३५ सूचना जनतेच्या आल्या त्याद्वारे जाहीरनामा तयार करण्यात आला. यामधील गोष्टी अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. राज्यात महायुती सरकार राज्यातील जनतेची स्वप्न पूर्ण करण्याचे काम करेल. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे. दिलेले वचन आम्ही पाळतो म्हणून देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने निवडून आणले. राज्यात अटल सेतू, समृध्दी महामार्ग, मेट्रो प्रकल्प विस्तार, विमानतळ विस्तारीकरण, विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना माध्यमातून वर्षाला महिलांना आता २५ हजार रुपये मिळतील. ५५ लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफी करण्यात आली आहे. दहा लाख विद्यार्थी यांना विद्या वेतन मिळणार असून वीज बिलात ३० टक्के माफी देण्यात येणार आहे. ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवले जाणार असून रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.