महाराष्ट्रात हरियाणाहून मोठा विजय मिळवणार:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार; काँग्रेसवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा केला आरोप

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही जिंकण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. त्यांनी बुधवारी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करताना काँग्रेसवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. तसेच हरियाणा जिंकला, आता महाराष्ट्रही जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मोदींच्या या निर्धारामुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी आला. त्यात भाजपने हरियाणातील अशक्यप्राय वाटणारा विजय अत्यंत सहजपणे मिळवला. त्यानंतर बुधवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणे ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टीम शहरी नक्षलवादी गँगने मतदारांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्वच कट कारस्थान उद्ध्वस्त झाले. काँग्रेसने दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. पण दलितांनीही त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटले. काँग्रेस त्यांचे आरक्षण काढणार असल्याची जाणिव त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे हरियाणातील दलित समाजाने भाजपला विक्रमी मतदान केले आहे. एवढेच नाही तर तेथील ओबीसीही समुदायही भाजपच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात हरियाणाहून मोठा विजय मिळवणार नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या या कटकारस्थानांचा महाराष्ट्रातील जनतेने पराभव केला पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला आता भाजप महायुतीसाठी मतदान करायचे आहे. भाजपने हरियाणा तर जिंकला, पण आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे. कारण, मागील 10 वर्षांत आमच्या सरकारने देशाच्या विकासासाठी मोठा यज्ञ सुरू केला आहे. काँग्रेस समाजात द्वेष पसरवणारी मोठी फॅक्ट्री बनणार असल्याची जाणिव तेव्हाच अनेक नेत्यांना झाली होती. त्यामुळेच काँग्रेसचा गाशा गुंडाळला पाहिजे, असे स्वतः महात्मा गांधी म्हणाले होते. काँग्रेस स्वतः संपली नाही. पण आता ती देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले. दलित, शेतकरी, तरुणांचा भाजपवरच विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला. पण शेतमालाला एमएसपी कुणी दिली? हे शेतकऱ्यांना माहिती आहे. काँग्रेसने तरुणांना टार्गेट केले. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनीही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपवरच विश्वास ठेवला. काँग्रेसने ना-ना प्रकारचे प्रकारचे प्रयत्न केले. फूट पाडा व सत्ता मिळवा हेच त्यांचे धोरण झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस एक बेजबाबदार पक्ष बनल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस देशात फूट पाडण्यासाठी नवनवी कारस्थाने आखत आहे. त्यांचा समाजात फूट पाडण्याचाही प्रयत्न आहे. मुस्लिमांना भीती घाला व त्यांचे मतपेटीत रुपांतर करा हा त्यांचा स्वच्छ फॉर्म्युला आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने मुस्लिमांमध्ये किती जाती असतात याचा उल्लेख केला नाही. मुस्लीम जातींचा मुद्दा येताच त्यांच्या तोंडाला कुलूप लागते. पण हिंदूंचा मुद्दा येतो तेव्हा त्यांची चर्चा जातीवरूनच सुरू होते. कारण, हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल तेवढा आपल्याला फायदा होईल हे काँग्रेसला चांगले ठावूक आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Share

-