जाणीवपूर्वक कोणावरही रंग टाकू नका:अबू आझमींची हिंदू बांधवांना विनंती, रमजाननिमित्त मुस्लिम समाजाला केले महत्त्वाचे आवाहन
राज्यात आज होलिका दहन उत्साहात पार पडले. शुक्रवारी धूलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी रमजान ईद आणि धूलिवंदन एकाच दिवशी आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे. रमजान ईद आणि होळी एकत्र येत आहेत. मी माझ्या हिंदू बांधवांना विनंती करतो की, त्यांनी कोणावरही छेडछाड करण्यासाठी रंग टाकू नका आणि मुस्लिम बांधवांना विनंती करतो की, कोणी तुमच्यावर रंग टाकला तरी संयम बाळगा. परस्पर बंधुभाव वाढावा आणि सर्वांना एकत्र राहू राहण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत, असे अबू आझमी म्हणालेत. देशभरात होळी आणि रमजान ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यंदा होळी (धुलिवंदन) आणि रमजान ईद दोन्ही सण शुक्रवारी येत असल्यामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दोन्ही समुदायांमध्ये शांतता आणि एकोप्याने सण साजरे व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी जनतेला विविध सूचना आणि आवाहन केले आहेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेक ठिकाणी नियमावली लागू करण्यात आलेली आहे. दरम्यान, अबू आझमी यांनीही एक व्हिडिओ शेअर करत दोन्ही समाजांना उपरोक्त आवाहन केले आहे. नेमके काय म्हणाले अबू आझमी? नमाज इस्लाममध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही नमाज मशिदीमध्ये जाऊन अदा करा किंवा घरातही अदा केला जाऊ शकतो. पण जुम्माचा नमाज मशिदीमध्येच अदा केला जातो, घरात नाही. 14 मार्चला रमजान आणि होळीही आहे. जे लोक वर्षभर कमी वेळा नमाज अदा करतात किंवा एकदाही करत नाहीत तेही मोठ्या प्रमाणात या दिवशी नमाज अदा करतात, असे अबू आझमी म्हणाले. कोणी रंग टाकला संयम बाळगा रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी हिंदू बांधवांना विनंती करतो की तुम्ही जाणीवपूर्वक कोणावरही रंग टाकू नका. मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की, त्यांचाही सण आहे, तुमच्यावर कोणी रंग टाकला तरीही संयम बाळगा, रमजानचा महिना आहे. कोणताही वाद घालू नका. मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करा आणि थेट घरी जा. या देशात सलोखा टिकून राहू देत. कोणतेही वाद विवाद होऊ नयेत, असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे. धूलिवंदनानिमित्त मुंबई पोलिसांकडून आदेश जारी दरम्यान, मुंबई पोलिसांनी धूलिवंदनाच्या निमित्ताने आदेश जारी केला आहे. 12 ते 18 मार्च दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंग फेकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा या आदेशामध्ये दिला आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी किंवा रंग फेकणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे. याशिवाय, जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नका, असे आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.