काश्मिरात झाला होता ऋषी कपूर यांच्यावर हल्ला:जमाव भडकला, हॉटेलला आग लागली, मग मदतीसाठी बोलावले होते लष्कर

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी काश्मीरमधील पहलगाममध्ये कभी कभी चित्रपटाचे शूटिंग केले. शूटिंगदरम्यान अशी घटना घडली की ऋषी कपूर यांना हॉटेलमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली. मात्र, या घटनेत ऋषी कपूर यांना कोणतीही हानी झाली नव्हती. वाचा काय होती संपूर्ण घटना? ऋषी कपूर यांनी खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड या त्यांच्या आठवणीमध्ये खुलासा केला होता की, ते पहलगाममध्ये शूटिंग करत असताना यश चोप्रांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्यांची पत्नी नीतू आणि सहअभिनेता नसीमही उपस्थित होते. त्या दिवशी त्यांनी एका गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते. पार्टीचे पाहुणे हॉटेलच्या आत मजा करत होते आणि बाहेर काय चालले आहे याची त्यांना पूर्ण कल्पना नव्हती. प्रत्यक्षात घोडेमालक आणि टॅक्सी चालक यांच्यातील वादाने भयानक वळण घेतले होते. एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत मारामारी सुरू केली. काही वेळातच परिस्थिती अत्यंत बिकट झाली. हजारो लोकांच्या जमावाने हॉटेलवर दगडफेक आणि आगीचे गोळे फेकून गोंधळ घातला. लोकांनी दगडफेक सुरू केली, हॉटेलला आग लागली ऋषी कपूर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा त्यांना आणि इतरांना त्यांच्या खोलीत पाठवण्यात आले. त्यांना त्यांच्या पलंगाखाली लपण्यास सांगण्यात आले, पुढे काय होईल हे कोणालाही माहिती नव्हते. त्यांच्या खोल्या आतून बंद होत्या, मात्र हॉटेलवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. हॉटेललाही आग लागली. लष्कराने येऊन ऋषी कपूर आणि इतरांना मदत केली ऋषी कपूर म्हणाले की, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना लष्कराची मदत घ्यावी लागली होती. नंतर लष्कराने ऋषी कपूर आणि इतरांना तेथून बाहेर पडण्यास मदत केली. 1976 मध्ये रिलीज झालेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटात ऋषी कपूरव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, राखी गुलजार, शशी कपूर आणि नीतू कपूर यासारखे कलाकार होते. हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता.

Share

-