कायद्याचा वापर तलवार म्हणून नाही तर ढाल म्हणून करावा:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगला कांबळे यांचे प्रतिपादन
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार केले आहे. तथापि, महिलांनी कायद्याचा वापर नेहमी ढाल म्हणून करावा, तलवार म्हणून कायद्याचा वापर करू नये, असे प्रतिपादन जिल्हा वरिष्ठस्तर न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मंगला कांबळे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महावितरण विभागीय प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शालिनी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कांबळे म्हणाल्या, की आज सती प्रथा, केशवपन यासारख्या गोष्टी नाहीत, तरी पण समाजाला प्रबोधनाची गरज आहे, केवळ व्यक्तिगत अहंकार दुखावल्यावरून प्रकरण घटस्फोटापर्यंत आणि कोर्टापर्यंत जाते. सामंजस्याने जगायला शिकले पाहिजे, वाद होऊ नये याची काळजी महिला व पुरुष या दोघांनीही घेतली पाहिजे. पाळण्याची दोरी जर महिलांच्या हाती आहे, तर आपल्या बाळाला स्त्री-पुरुष समानतेचे, चांगल्या संस्काराचे बाळकडूही महिलांनीच दिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून आलेल्या पाहुण्यांचा परिचय सहायक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक अभियंता प्रियंका सोळंके यांनी केले, तर आभार व्यवस्थापक कल्पना भुले यांनी मानले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिमंडळातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. प्राचार्य ललिता देशमुख म्हणाल्या, की अनेक सामाजिक बंधने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यासाठी स्वतः छळ सहन केला. काळाच्या ओघात आजच्या मुलींना सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रात अनेक सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, तथापि, सावित्रीबाईंच्या कष्टाची जाणीव आजच्या मुलींनी ठेवली पाहिजे. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच विवाह संस्था आणि कुटुंब संस्था टिकवण्यासाठी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होऊ नये याची काळजी घ्या