किशनचंद तनवाणी 14 नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत:मोदी, ठाकरेंच्या सभांचाच निवडला दिवस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगर मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला. आता तनवाणी १४ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळा करून घेतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. तनवाणी यांनी उमेदवारी परत करताच त्यांना जिल्हाप्रमुखपदातून मुक्त केले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नंतर त्यांच्या १८ समर्थक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला. यातील काहींनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिंदुत्वासाठी माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांची भेट घेतली होती.
१४ नोव्हेंबर महत्त्वाचा दिवस : १४ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांची चिकलठाण्यात व उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मंडळावर सभा आहे. दोन्ही नेते शहरात असल्याने तनवाणी यांनी याच दिवशी पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे मानले जाते. काही पक्षांचे पदाधिकारी भेटून गेले मी उद्धवसेना सोडल्यानंतर मला शिंदेसेनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी येऊन भेटले. मात्र, अजून कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा याबाबत माझा निर्णय झालेला नाही. – किशनचंद तनवाणी, माजी आमदार, उद्धवसेना

Share