कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?:सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका
अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाचे कौतूक करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरवर सरकार कारवाई का करत नाही? असा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते दोघे सरकारचे जावई आहेत का? असेही आव्हाड म्हणाले. ते विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावर बोटं उठवणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई आहेत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. शिवाजी महाराजांबद्दल यांना किंचितही प्रेम नाही. सगळे नाटक आहे. त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळे झाकण्यासाठी अबू आझमीला पुढे केले. अबू आझमींवर काय कारवाई करायची ती करा, पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांचे काय करणार? ते तरी महाराष्ट्राला कळू द्या, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. …पण कोरटकर आणि सोलापूरकरला काही करू नका पंडित नेहरूंनी काय लिखान केले?, मग सावरकर काय लिखाण केले? यावर चर्चा करा. मग त्याच्या आधी कुणी काय लिखाण केले त्यावर चर्चा करा. अन् मग चर्चेसाठी एक महिना घ्या. पण कोरटकर आणि सोलापूरकरला काही करू नका,अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. कारण नसताना कोणते लांबण लावू नका तुम्हाला राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला वाचवाचये असेल, तर वाचवा. पण कारण नसताना टिळक काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले, असे लांबण लावू नका. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर जिवंत असताना तुमच्या डोळ्यांदेखत काय म्हणाले त्याच्याबद्दल बोला ना, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला. दरम्यान अबू आझमींच्या निलंबनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले होते. परंतु,या बेगडी हिंदुत्व वाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीने अविष्कार केला जातोय, हा अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले होते. सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्याने बोलायला दिले जाते, आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. तसेच कोरटकर, सोलापूरकरांविरोधात महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 97 अन्वये नुसार प्रस्ताव दिल्याचे ते म्हणाले.