लाडक्या बहिणींसाठी पैसे जमवताना सरकारची दमछाक:आदिवासी – समाजकल्याणचे 7 हजार कोटी वळवले; मंत्री दादांना विचारणार जाब
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 3 व आदिवासी विभागाचा तब्बल 4 हजार कोटींचा निधी वळता केल्याची बाब समोर आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट अर्थमंत्री अजित पवार यांना जाब विचारण्याचे संकेत दिलेत. लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे अर्थविभाग वेगवेगळ्या विभागांचा निधी पळवून या योजनेसाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी आदिवासी व दुर्बल घटकांच्या विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या समाजकल्याण व आदिवासी विभागाचा सुमारे 7 हजार कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अर्थखात्याने समाजकल्याणचा 3 हजार कोटी, तर आदिवासी विभागाचा तब्बल 4 हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केला आहे. यामुळे या दोन्ही खात्यांच्या विविध योजनांना कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर या दोन्ही खात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, घटनात्मक तरतुदींनुसार या दोन्ही खात्यांचा निधी इतरत्र वळवता येत नाही. पण आता या विभागाचा हक्काचा पैसा लाडकी बहीण योजनेला वळता करण्यात आल्याची माहिती आहे. ही योजना सर्वांसाठी असेल तर आदिवासी व दलित महिलांनाही त्याच योजनेतून योग्य ती तरतूद केली पाहिजे. अजित पवारांना कारण विचारणार – शिरसाट दुसरीकडे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, नियमानुसार दोन्ही विभागांना निधी देणे बंधनकारक आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे. पण त्यानंतरही या दोन्ही विभागांचा निधी हा इतर ठिकाणी वळवण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल, तर त्यासाठी पैसा उभा करणे आवश्यक आहे. पण यासाठी योजनेसाठी दलित व आदिवासी समाजासाठी असणारा निधी वळवण्यात आला आहे. आता अर्थसंकल्पावरील चर्चेत देण्यात येणाऱ्या उत्तराकडे आमचे लक्ष असेल. तसेच हा निधी का वळवण्यात आला याचे कारणही आम्ही अजित पवारांना विचारू. मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात उल्लेखनीय बाब म्हणजे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळाला. त्यानंतर आता होळी व धुळीच्या निमित्ताने त्यांना मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ताही वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे सणवार आनंदात जात आहेत. दरम्यान, सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करते.