लासलगावी 43 मिमी पाऊस, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थानात पाणी:जोरदार पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, विहिरी तुडुंब

निफाडच्या उत्तर भागातील उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळे भागात रविवारी मध्यरात्री झालेल्या अतिजोरदार पावसामुळे विनता नदीला मोठा पूर आला. हे पूरपाणी मध्यरात्री उगावलगत नदीकाठी असलेल्या शाळेत व स्मशानभूमीत घुसले. उगाव-पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतुकही सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद होती. येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पाणी आल्यामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. सध्या द्राक्षबागांचे फळबहार छाटणीचा काळ सुरू आहे, त्यातच अतिवृष्टीमुळे फळबहार छाटणी व मशागतीचे कामांना ब्रेक लागला आहे. नवीन फुटवा होत असलेल्या द्राक्षबागेच्या कोवळ्या फुटीची तुटफूट होऊन नुकसान होत आहे. प्रतिनिधी | लासलगाव शहरात रविवारी सायंकाळी पावसाने लासलगावकरांना अक्षरश: झोडपून काढले. या हंगामातील सर्वाधिक पाऊस ४३ मिमी इतकी नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर करण्यात आली आहे. शहराच्या जवळ असलेल्या पिंपळगाव नजीक येथील शास्त्रीनगर बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग शिवनदीत सुरू झाला आहे. जोरदार पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेली सोयाबीन व मका यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून रिमझिम पाऊस परिसरात होता अजून पर्यंत विहिरींना पाणी उतरलेले नव्हते अशी परिस्थिती असताना एकाच दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले. लासलगाव ग्रामीण रुग्णालयालगत असलेला नाला फुटल्यामुळे कर्मचारी निवासस्थान परिसरात पाण्याचे तळे साचले होते. यात दुचाकी पूर्णतः बुडाल्या होत्या. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. शहरात आत्तापर्यंत संपूर्ण पावसाळ्यात जवळपास ५५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Share

-