लोकसभेत मला फसवले, आता असे करू नका:सुनील तटकरेंचा मुस्लिम कार्यकर्त्यांना चिमटा, म्हणाले चहा प्या बिस्मिल्ला करा

रायगड लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात लढत झाली आणि सुनील तटकरे विजयी झाले. सुनील तटकरे विजयी झाले असले तरी त्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाचे मतदान घटल्याचे दिसून आले होते. यावरून आता सुनील तटकरे यांनी अल्पसंख्यांक यांना उद्देशून टिप्पणी केली आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचार सभेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, लोकसभेला मला फसवले, तसे यावेळी करू नका. मी तुमच्यासोबत आहे, आता बस कपभर चाय घ्या. बिस्मिल्ला करा म्हणजे सगळे चांगले होईल. चार महीने तुम्ही सोबत नव्हता. ती आठवण आता मला कशाला करून देता. मी सुद्धा आता ते विसारलो आहे. मात्र आता या निवडणुकीला विसरू नका, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे आव्हान असणार आहे. सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचे पाठबळ असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. महेंद्र थोरवे म्हणाले, सुनील तटकरे यांनी महायुतीचा धर्म मोडला आहे. महायुतीत असूनही सुनील तटकरे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करण्यास सर्वांना सांगत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहेत असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली आहे. विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. तसेच इतरही पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केले असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे. काही जागांवर अद्यापही महायुतीमधील नेत्यांमध्ये अजूनही वाद असल्याचे दिसत आहे.

Share

-