माणगावात चौघांचा बुडून दुर्दैवी अंत:कुंडलिक नदीत बुडत्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघीही बुडाल्या

नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे ही घटना घडली आहे. कुंडलिक नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यात चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले. कुंडलिक नदीत बुडालेल्या मृतांना बाहेर काढण्याचे कार्य बचाव पथक करत आहे. आत्तापर्यंत दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. सिद्धेश राजेंद्र सोनार (21), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (16), काजळ सोनार (26) आणि सोनी सोनार (27) असे मृतांचे नाव आहेत. बचाव पथकाने सिद्धेश राजेंद्र सोनार आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत. शिरवली येथे आजीच्या गावी ते आले होते. मात्र, हा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढवला. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आली नाही आणि या देखील पाण्यात वाहून गेल्या. त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. बुडालेल्यांपैकी सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश आले आहे. अद्याप दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत. घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Share