मदन मोडक यांची वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याला भराघोस देणगी:एक कोटी अकरा लाखाचा धनादेश सरसंघचालकांकडे सुपूर्त

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्त केला. मोडक हे देवरुख येथील प्रतिष्ठित बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते असून स्वामी समर्थ सेवक प्रतिष्ठान, देवरुख शिक्षक प्रसारक मंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद अशा विविध संस्थामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी उभारलेल्या शहीद जवान स्मारक प्रकल्पाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. मोडक यांनी स्वत: कल्याण आश्रमाच्या कामाची माहिती घेऊन सदर देणगी कल्याण आश्रमाच्या कामासाठी दिली. यावेळी झालेल्या एका विशेष समारंभात कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांच्यासह मोडक यांच्या दोन्ही कन्या सहपरिवार उपस्थित होत्या. “माझे वडील भारतीय सेनेत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारातून मला ही सेवेची प्रेरणा मिळाली. सामाजिक बांधिलकीतून मी ही मदत करत आहे’, असे मोडक यांनी मनोगतातून सांगितले. यावेळी बोलताना कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी समाजाने सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. वनवासी कल्याण आश्रम देशभरातील वनवासी बांधवांच्या विकासासाठी कार्यरत सामाजिक संस्था असून छात्रावास, विद्यालय, एकल विद्यालय, आश्रमशाळा या माध्यमातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य संस्था करीत आहे. संस्थेद्वारा रुग्णालय, आरोग्य केंद्र, आरोग्य शिबिर, ग्राम आरोग्य रक्षक योजनेच्या माध्यमातून लाखो रुग्णांची सेवा केली जाते. अशा या बहुआयामी कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन मोडक यांनी या कामासाठी देणगी दिली आहे.

Share

-