महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करा:प्रकाश आंबेडकरांची मागणी, वंचित बहुजन आघाडी बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार

बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, 1949 रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१२) राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही ॲड. आंबेडकरांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, बौद्ध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या आंदोलनात बौद्ध समाज आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन भारतविरोधी दरम्यान, बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ सध्या बौद्ध समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. या चळवळीला देशभरातील तसेच परदेशातील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच महाबोधी मंदिर मुक्ती ही केवळ धार्मिक बाब नसून, ती भारताच्या राजनैतिक, सांस्कृतिक आणि परराष्ट्र संबंधांशी संबंधित महत्त्वाची चळवळ असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रचंड चळवळीच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन भारतविरोधी असल्याचेही ते म्हणाले होते. बौद्ध धर्म हा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाचा आहे. भारताच्या बौद्धधर्मीय भागीदारीमुळे जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि कंबोडिया यासारख्या देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले आहे, असे आंबेडकर म्हणाले होते. शिवाय देशातील विरोधी पक्षांनीही या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

Share