महाराष्ट्राच्या राजकारणात अफवांचे पेव:ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल्याचा अन् संजय राऊत यांनी अमित शहांना फोन केल्याचा दावा

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे व खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा रंगल्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यामुळे स्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व स्वतः संजय राऊत यांनी पुढे येत ही बातमी पेरण्यात आल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटात जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस ठाकरे गटाला हव्या त्या जागा देण्यास तयार नाही. विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिकाही अनेकांना मान्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कंटाळून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची व संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून चर्चा केल्याचा दावा ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे. या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर कांग्रेसने तत्काळ पुढाकार घेत हे वृत्त फेटाळून लावत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे स्पष्ट केले. सदर बातमी 1 टक्काही खरी नाही. काँग्रेस व ठाकरे गटात तणाव वाढवण्यासाठी भाजपने या बातम्या पेरल्या आहेत. पण आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे, तो तुटणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ठाकरे गट महाविकास आघाडीतच – काँग्रेस उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतीही भेट झाली नाही. भाजपकडून आमच्यात वाद निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. कारण, भाजपची प्रचंड घाबरगुंडी उडाली आहे. संजय राऊत यांना तुरुंगात कुणी पाठवले? त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झाली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडी बरोबर आहे. संजय राऊत व अमित शहांतील कथित चर्चेवरही आमची हायकमांडशी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्यातील जागावाटपाचा पेच जवळपास संपला आहे. मंगळवारपर्यंत सर्वकाही सुरुळीत होईल, असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. काही लोकांनी भाजपची सुपारी घेतली – संजय राऊत दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही सरळ सरळ पतंगबाजी असल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या भाषेत याला मोठी सुपारी असेही म्हणता येईल, असे त म्हणाले. संजय राऊत म्हणाले, त्या लोकांनी भाजपची सुपारी घेतली आहे. भाजप व त्यांचे लोक आम्हाला घाबरलेत. या लोकांच्या जाळ्यात अडकणारा मी शेवटचा माणूस असेल. आम्ही एवढा संघर्ष त्यांच्यासोबत जाण्यासाठी केला आहे का? आमचा लढा महाराष्ट्राचे शत्रू, महाराष्ट्राला लुटणाऱ्यांविरोधात आहे. या लुटारूंच्या सरदारांशी आमचे नाव जोडले जात आहे. त्यातून केवळ भाजपची भीती दिसून येते. हे षडयंत्र आहे. त्यात आणखी काही लोकांचा हात असू शकतो. शिवसेना कधीही अशा ताकदींशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्यासोबत जाणार नाही. ज्या लोकांना या देशाचे संविधान संपवायचे आहे. ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ मांडला, त्यांच्यासोबत आम्ही केव्हाही जाणार नाही. शिवसेनेने या ताकदींविरोधात सर्वाधिक संघर्ष केला. त्यांनी आम्हाला तुरुंगात डांबले. आमचा पक्ष फोडला. आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले. हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात सोपवला. ही वेदना घेऊन आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष केला. आता कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाची औलाद नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. त्यांनी स्वतःचा बाप दाखवावा किंवा श्राद्ध घालावे. अशा बातम्या पेरणाऱ्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही, असा संताप संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. वंचितनेही केला होता भेटीचा दावा उल्लेखनीय बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीनेही यापूर्वी एक असाच दावा केला होता. संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते, ते स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात 2 तास बैठक झाली, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या सिद्धार्थ मोकळे यांनी केला होता.

Share

-