महाविकास आघाडीला मोठा दिलासा:’आप’चा महाराष्ट्रात विधानसभा न लढवण्याचा निर्णय; INDIA ला बळ देणार?

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. याचे विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीला पाठिंबा देईल. आपच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या मतांची विभागणी टळून त्याचा थेट फटका भाजप पर्यायाने महायुतीला बसण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रीत करणार यासंबंधीच्या वृत्तानुसार, आपकडून सध्या केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यासाठी हा पक्ष इंडिया आघाडी मजबूत करण्यासह पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, आपची महाराष्ट्रातील कार्यकारिणी विधानसभा लढवण्याची तयारी करत होती. पण आपने येथील एक-दोन जागांसाठी वाटाघाटी करण्यात वेळ वाया न घालता इंडिया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला. 2019 ची निवडणूक लढवली होती उल्लेखनीय बाब म्हणजे आम आदमी पार्टीने 2019 साली महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील 288 पैकी 24 मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील 23 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. झारखंडमध्येही आपने 81 पैकी 26 जागांवर आपले नशीब आजमावले होते. पण तिथेही त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 व 20 नव्हेंबर अशा 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांतील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. हे ही वाचा… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली:राजकीय पक्षांचा वाढता आकडा काळजीचा, यंदा 1995 सारखे अपक्ष तर बाजी मारणार नाहीत? मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 2 दिवसांनी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्त्वात येण्याचा मार्ग मोकळा होईल. विश्लेषकांच्या मते, यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत रोचक लागतील. त्यामुळे राज्यात कुणाचे सरकार बनणार? कोण मंत्री होणार? आणि किंगमेकरची भूमिका कोण बजावणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा सविस्तर

Share

-