महाविकास आघाडीत 24 जागी 36 चा आकडा:जागावाटपावरून उद्धवसेना- काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाक‌ युद्ध

महाविकास आघाडीत विधानसभेच्या २५० मतदारसंघांत एकमत झाले. आता उर्वरित ३८ पैकी २४ जागांवरून काँग्रेस व उद्धवसेनेत जी खदखद सुरू होती त्याचा शुक्रवारी भडका उडाला. आता निवडणुकीला कमी वेळ राहिल्याने काँग्रेसने तातडीने निर्णय घ्यावा यासाठी उद्धवसेनेचे नेते आग्रही आहेत. या वादग्रस्त २४ जागा मुंबई व विदर्भातील आहेत. त्यावर उद्धवसेनेचा दावा आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भातील जागा सोडायला तयार नाहीत. त्यावरून गुरुवारी आघाडीच्या बैठकीतही खदखद झाली होती. शुक्रवारीही फेरविचारासाठी पुन्हा बैठक ठेवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी ‘राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत’ असा आरोप करून पटोलेंचा इगो दुखावला. महाविकास आघाडीच्या दुपारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता आधी पटोलेंनी यावर बोलणे टाळले. ते प्रेस सोडून निघाले होते, पण वडेट्टीवार यांनी त्यांना रोखले. नंतर मात्र याच मुद्द्याला धरून नाना पटोले यांनी राऊतांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे वाद चिघळला. हायकमांडला तुम्ही विचारताय की नाही… याचा जाब विचारला निवडणुकीला वेळ कमी असताना बऱ्याच जागांवर निर्णय होत नाहीय. काँग्रेसचे राज्यातील नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग चर्चा होते. वेळ निघून गेलीय. लवकर निर्णय झाला पाहिजे.- संजय राऊत 1. रद्द झालेली बैठक आज होण्याची शक्यता मविआच्या नेत्यांनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार वगळण्याबाबत तक्रार केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संयुक्त बैठकही होणार होती, मात्र नाना व राऊत यांच्या वादामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक शनिवारी होणार आहे.
2. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला तोडगा काढणार हा सगळा वाद मुख्यमंत्रिपद कुणाला यावरून आहे. काँग्रेस व उद्धवसेना दोघांचेही यावर दावे. जास्त जागा लढवून जास्त जिंकणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. आता काँग्रेस प्रभारी चेन्नीथला शनिवारी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंशी चर्चा करत या वादावर तोडगा काढणार आहेत. 3. या जागांवर आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा दक्षिण नागपूर, श्रीगोंदा, पारोळा, हिंगोली, मिरज, शिर्डी, रामटेक, सिंदखेडराजा, दर्यापूर, गेवराई, उदगीर, तुमसर , कुलाबा, भायखळा, वर्सोवा यासह एकूण २४ मतदारसंघांवरून या दोन पक्षांमध्ये वाद असल्याचे आघाडीतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. शरद पवारांचा दिल्लीला फोन
या वादाची माहिती मिळताच शरद पवार यांनी थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडला फोन करून प्रदेश पातळीवर नेत्यांना समज देण्याची सूचना केली. तसेच तातडीने जागावाटपावर निर्णय घेऊन उमेदवारांची नावे जाहीर करण्यासही सुचवले. उद्धवसेना- काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाक‌्युद्ध विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. केंद्रीय समितीने बुधवारी दिल्लीत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण शिंदेसेना व अजितदादा गट भाजपच्या आॅफरवर सहमत नाहीत. शिंदेसेना १०० तर दादा गट ८० जागांवर ठाम आहे. या वादामुळे भाजपची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होऊ शकली नाही. अखेर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे अंतिम तोडगा काढण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. तिथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केल्याचे वृत्त आहे. भाजपत ३६ जागी बंडखोरीचा धोका निष्ठावंतांना सोडून ‘उपऱ्या’ नेत्यांना उमेदवारी दिल्यास वेगळा मार्ग स्वीकारण्याची भूमिका निष्ठावंत भाजप नेत्यांनी घेतली आहे. राज्यात अशा ३६ मतदारसंघांत भाजपला बंडखोरीचा धोका आहे. या लोकांचे मन वळवण्यासाठी अन्य राज्यांतून पक्षनिरीक्षक दाखल झाले आहेत. बहुतांशी भाजप निष्ठावंत अजित पवार युतीत नकोच, अशी भूमिका घेत आहेत. पक्षाने एेकले नाही तर बंडखोरीची त्यांची तयारी आहे. उत्तर महाराष्ट्रात ४० निरीक्षक आले आहेत. अहिल्यानगरमध्ये गुजरातचे आमदार महेश कसवाला यांनी पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. या बैठकीत बहुतांश भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा प्रचार करण्यास विरोध केला. उद्धव ठाकरेंना खा. राऊत विचारतात का? : पटोले संजय राऊत यांना जशी त्यांच्या पक्षप्रमुखांना माहिती द्यावी लागते तशीच आम्हालाही दिल्लीत द्यावी लागते. संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा स्वत:ला मोठे समजत असतील. ते ठाकरेंना न विचारता निर्णय घेत असल्यास त्यावर मला बोलायचे नाही. – नाना पटोले

Share

-