वरिष्ठांवर आरोप करत महिनाभरात 40 पदाधिकाऱ्यांचा उबाठाला ‘जय महाराष्ट्र’:फोडाफोडीचे राजकारण शिगेला; सभांमधून पक्षप्रवेश करून घेण्यासाठी चढाओढ

अगदी निवडणुकीतच राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. उद्धवसेनेने जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत भाजपचे नेते फोडून उमेदवारी दिली. त्या बदल्यात महायुतीनेदेखील उद्धवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांचा आतापर्यंत प्रवेश करून घेतला. आता माजी आमदार तनवाणीसुद्धा त्याच वाटेवर आहेत. दरम्यान भाजप आणि अजित पवार गटात मिळून तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शहरात पार पडणार आहे. या सभेत आणखी प्रवेश होतात का हे पाहावे लागणार. पश्चिम मतदारसंघात बप्पा दळवी, संजय बारवाल यांच्यासह ४ शाखाप्रमुख, १० गटप्रमुख, १२ बूथप्रमुखांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ १८ तनवाणी समर्थकांनी उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत त्यांच्या पाठीमागे जाणे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावर आरोप करीत शिंदेसेनेत प्रवेश केला. तर बंडू ओक यांच्यासारख्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीदेखील अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. एवढे झाले तरी मातोश्रीतील वरिष्ठ नेत्यांनी, संपर्कप्रमुखांनी येऊन ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेस, एमआयएम अशी वाटचाल निष्ठावंत कार्यकर्त्यांची त्यांना गरज नाही, उबाठा गटाला काही फरक पडत नाही, याचे कारण त्यांची युती एमआयएमशी झाली. त्यांची स्वत:चीच काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम अशी राजकीय वाटचाल होत असल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांना गरज उरली नाही. यातूनच खरी शिवसेना कुणाची हे लक्षात येईल. -संजय शिरसाट, प्रवक्ते, शिंदेसेना जुन्या शिवसैनिकांची खदखद या फोडाफोडीबाबत शहरातील काही ज्येष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधला असता त्यांनी पूर्वी पक्ष सोडून जाणे म्हणजे खूप मोठी हिंमत करणे असे सांगितले जायचे. एखाद्याने पक्ष सोडला तर त्याला काही दिवस शहरातून गायब व्हावे लागत होते, असे शिवसैनिक सांगतात. मात्र स्थानिक नेतृत्वातील वादामुळे पक्षातील ही जरब संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. किमान राहिलेल्या पक्षाने तरी एकत्र आले पाहिजे, अशी खदखद शिवसैनिकांनी व्यक्त केली. उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांना थेट सवाल तुमच्या पक्षातील ३० ते ४० पदाधिकारी शिंदेसेनेत गेले याचे काय कारण ? त्यांना अामिष, प्रलोभन दाखवले जात आहे, त्यामुळे ते जात आहेत.
तनवाणी, विजय वाघचौरे, बप्पा दळवी लोक गेले…
तनवाणी यांनी स्वत: सगळा निर्णय घेतला. त्यांना तिकीट देणे हीच आमची चूक झाली. विजय वाघचौरे यांना कोटींची कामे लागतात. बप्पा दळवी का गेले मला माहीत नाही. पदाधिकारी सोड़ून गेल्याने पक्षाला काही नुकसान होणार नाही का? काही नुकसान होणार नाही. शिवसेनेचे ४० आमदार गेल्याने पक्षाला काही नुकसान झाले नाही. हे लोक गेल्याने काही होणार नाही. तुम्ही ग्रामीणमध्ये अनेकांना पक्षात घेतले, शहरात काही प्रवेश होतील का ? हो, शहरातही अनेक प्रवेश होतील. उद्धव ठाकरेंच्या सभेवेळी ते पाहायला मिळेल.

Share