मराठा आंदोलनाची धग असलेल्या मराठवाड्यात पंतप्रधान मोदींनी राबवला हरियाणा पॅटर्न:मराठा मतदार दुरावल्याचे लक्षात येताच ओबीसी-मायक्रो ओबीसींवर केले लक्ष केंद्रित

मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे अपयश पदरी पडल्याने विधानसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना बदलण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची धग असलेल्या मराठवाड्यात नुकताच हरियाणा विधानसभेत यशस्वी केलेला पॅटर्न राबवण्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी (१४ नोव्हेंबर) शहरात झालेल्या सभेत त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासंबंधी चकार शब्द काढला नाही. याउलट एससी, एसटी व ओबीसींना आपल्या भाषणातून संदेश दिला. एवढ्यावरच मोदी थांबले नाही तर आपण ओबीसी असल्याने कसा द्वेष होत आहे, असेही त्यांनी सांगितले. ओबीसी आणि मायक्रो ओबीसींमधील अनेक जातींचा उल्लेख मोदींनी भाषणात केल्याने विधानसभेला बारा बलुतेदार-अलुतेदार जातींच्या ध्रुवीकरणाचे कार्ड खेळले. शहराच्या राजकारणावर याचा प्रामुख्याने प्रभाव पडणार आहे. पंतप्रधान मोदींची सभा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील चौदा विधानसभा मतदारसंघांसाठी होती. असे असले तरी प्रामुख्याने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि बाजूच्या फुलंब्री, बदनापूर व पैठण मतदारसंघांवर अधिक परिणामकारक समजली जाते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत नाराज जाट समाजाला सोबत घेत इतर जातींवर भाजपने लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे भाजपला बहुमताचा आकाडा पार करीत पुढचे मताधिक्य मिळाले आणि हॅट‌्ट्रिक करण्यात यश मिळाले. मराठवाड्यात मराठा बहुसंख्य मतदारसंघांत मराठा उमेदवार देत समाजाला सोबत घेऊन ओबीसींचे मतदान पारड्यात पाडण्याचे नियोजन केले. परिणाम : शहरात होऊ शकतो फायदा शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित नागरिकांची संख्या अधिक असते. पोटाची खळगी भरण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर नागरिक खेड्यातून शहरात येतात. यात आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींचा समावेश अधिक असतो. भूमिहीन, शेतमजूर, कामगार, सेवादार समाजातील संख्या अधिक आहे. प्रस्थापित समाजाची संख्या गावखेड्यांमध्ये जास्त आहे. शहरात अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्ग समाजाला मोदींनी आवाहन केले आहे. मोदींचे भाषण अन् भाजपची तयारी शहरात भाजपने इतर मागासवर्गाच्या ३० महत्त्वाच्या आणि मतदानात अव्वल असलेल्या जातींसोबतची वीण अधिक घट्ट केली आहे. शहरात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या ५२ वसाहती प्रचारासाठी भाजपकडून निवडण्यात आल्या आहेत. विरोधकांनी संविधान बदलाचे नरेटिव्ह सेट केल्याने लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजप ५२ वसाहतींमध्ये जाऊन केंद्र व राज्याने केलेल्या कामांचा पाढा वाचत आहे. शहरातील बुद्धिजीवी, नवमतदार, महिला, युवक आदींचे संमेलन घेत आहे. सुरक्षा, शिष्टाचार लेखाजोखा, साहित्य, होर्डिंग प्रमुख अशा ३९ समित्या बनवण्यात आल्या होत्या,असे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले.

Share

-