शहीद पोलिस स्मृतिदिन:तीन वर्षांत 439 पोलिस, तर 340 जवानांना वीरमरण; सीआरपीएफ, बीएसएफ व आयटीबीपी; पोलिसात छत्तीसगड, म.प्र. आणि कर्नाटक अव्वल

भारताच्या सीमांपेक्षा अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान देशासमोर असल्याची बाब शहीद पोलिस स्मृतिदिनाच्या निमित्ताने समोर आली आहे. देशात २१ ऑक्टोबर रोजी शहीद पोलिस दिन साजरा केला जातो. मागील तीन वर्षांत भारतीय निमलष्करी दलांचे ३४० जवान देशविघातक शक्तींच्या विरोधात लढताना धारातीर्थी पडले. देशाच्या प्रत्येक राज्याच्या पोलिस दलातील तीन वर्षांत कामी आलेल्या शहिदांची संख्या ४३९ इतकी आहे. देशांच्या सीमेपेक्षा देशात राहून काम करणाऱ्या शक्तींचा बीमोड करताना जास्त सुपुत्र कामी आल्याचे स्पष्ट होते. भारतामध्ये २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात पोलिस दल अथवा निमलष्करी दलात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. पोलिस हुतात्मा दिन २१ ऑक्टोबर १९५९ पासून साजरा केला जातो. भारताच्या लडाख येथील हॉटस्प्रिंग भागात चीन आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये सर्वप्रथम चकमक झाली होती. चीनच्या सैन्याने सीआरपीएफच्या २१ जवानांवर १९५९ मध्ये ग्रेनेड हल्ला करून तुफान गोळीबार केला होता. त्यात दहा जवान शहीद झाले होते. आठ दिवसांनंतर चीनने शहिदांचे पार्थिव भारताच्या ताब्यात दिले होते. शहिदांवर लडाखच्या हॉटस्प्रिंग भागातच अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून पोलिस हुतात्मा दिन पाळण्यात येतो.
निमलष्करी दलाची विशिष्ट जबाबदारी निश्चित
सीआरपीएफ ११९, आसाम रायफल्स ४, बीएसएफ ८७, सीआयएसएफ १७, आयटीबीपी ६३, एनएसजी १, एसएसबी १२, होमगार्ड ३, एनडीआरएफ १, रेल्वे सुरक्षा दल ३५, एनडीआरएफ २, एफएस, सीडी आणि एचजी-२ शहीद झाले. प्रत्येक निमलष्करी दलाची विशिष्ट जबाबदारी निश्चित केली आहे. सीआरपीएफकडे जम्मू आणि काश्मीरची अंतर्गत सुरक्षा, बीएसएफकडे भारत पाक आणि बांगलादेश सीमेचे रक्षण, आयटीबीपी चीन सीमा, आसाम रायफल्स म्यानमार सीमा तर सीआयएसएफकडे देशातील विमानतळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे आणि त्यांची मालमत्ता. एसएसबीकडे भारत, नेपाळ आणि भूतान सहमा आहे. हे सर्व सशस्त्र दल आहेत. तीन वर्षांत सीआरपीएफचे ११९ जवान शहीद वर्ष २०२१-२२, २२-२३ आणि २३ ते २४ या तीन वर्षांत निमलष्करी दलात सीआरपीएफचे ११९ जवान शहीद झाले. बीएसएफचे ८७ तर आयटीबीपीचे ६३ जवान देशाच्या कामी आले. पोलिस दलात छत्तीसगड राज्याच्या ६० जवानांना तीन वर्षांत वीरमरण आले. मध्य प्रदेश ५५, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानी ३६ जवानांनी जीवन समर्पित केले.

Share

-