वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट:19 कामगार गंभीर जखमी, स्फोटाचे कारण अस्पष्ट

वर्धा जिल्ह्यातील भुगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. फर्निश विभागाजवळ झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली, ज्यात कंपनीतील १९ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे कंपनी परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, जखमींना तातडीने शहरातील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना नागपूरला हलवण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. स्फोटाची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचे समजते. स्फोटाच्या भीषणतेमुळे कंपनीत मोठ्या प्रमाणावर आग पसरली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या त्वरित मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु आगीच्या रौद्र स्वरूपामुळे नियंत्रण आणणे आव्हानात्मक ठरले आहे. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही स्पष्ट होत आहे. आगीचे लोट दूरवर पसरले असून कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याआधीही कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. त्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी कंपनी व्यवस्थापनास कामगारांच्या सुरक्षेविषयी कठोर सूचना दिल्या होत्या. त्यांनी व्यवस्थापनास “कामगारांच्या आरोग्याशी खेळाल तर गाठ माझ्याशी आहे” असा इशारा दिला होता. परंतु, व्यवस्थापनाने पुन्हा दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

Share

-