मुंबईच्या घाटकोपर भागात भीषण आग:अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई येथील घाटकोपरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर येथील नारायण नगर विभागात असलेल्या एका प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्याच्यावरच सम्राट नामक एक शाळा देखील आहे. सुदैवाने ही शाळा बंद होती त्यामुळे मोठी हानी टळली आहे. कारखान्याला लागलेली आग वाढत असल्याने अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग देखील मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे समोर आले आहे. कारखान्याच्या गोदामची आग मोठ्या प्रमाणात वाढत असून, आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे. त्यामुळे लोकांना देखील सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या गोदाममध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आग भडकत असून आतमध्ये स्फोट होत असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. नारायण नगर येथील आग लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वस्ती व लहानसहान कारखाने आहेत. त्यामुळे, पोलिसांनी परिसरात धाव घेत वाहतूक मार्ग बंद केले असून वर्दळ हटविण्यात येत आहे. ऑइलच्या टँकरला मोठी आग
दरम्यान, मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात बुधवारी ऑइलच्या टँकरला मोठी आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दुपारच्या सुमारास इंडस्ट्रियल इस्टेट भागातून टँकर जात होता, अचानक या टँकरला आग लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अर्धा तास लागला होता.

Share

-