मी महाराष्ट्र बोलतोय:यशवंतराव चव्हाणांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी बाकांवरून आला

भारत – चीन संबंध नेहमीच तणावाचे आणि संशयाचे राहिले आहेत. जेव्हा जेव्हा हे संबंध ताणले जातात तेव्हा तेव्हा मला प्रकर्षाने आठवण येते ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांच्या कुशल आणि सर्वसमावेशी नेतृत्वाखाली माझ्या सर्वांगीण प्रगतीची मजबूत पायाभरणी सुरू असतानाच चीनने भारतावर आक्रमण केले. हिमालय संकटात सापडताच माझा सह्याद्री त्याच्या मदतीला धावून गेला. प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतरचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणासाठी दिल्लीला बोलावून घेतले. खरं तर तेव्हा मला चव्हाणांच्या आणखी योगदानाची प्रतीक्षा होती, परंतु ‘राष्ट्र प्रथम’ ही महाराष्ट्राची प्रेरणा आणि परंपरा राहिल्याने जड अंतःकरणाने त्यांना आम्ही दिल्ली प्रस्थानासाठी प्रेमादराचा निरोप दिला… इतिहासाची ठरावीक काळाने पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात … १९६२ नंतर तीन दशकांनी यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम आणि वयाच्या अवघ्या अडोतिसाव्या वर्षी “पुलोद’ प्रयोगाद्वारे जनसंघाला सोबत घेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरदचंद्र पवार हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यांच्या नावावर चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा जो विक्रम आहे त्याची या पुढील काळात बरोबरी केली जाण्याची शक्यता मला कमी वाटते …अर्थात, राजकारण हा शक्याशक्यतेचा खेळ आहे आणि त्यात काहीही होऊ शकते हे तुमच्यापेक्षा मी जास्त जवळून बघत आलो आहे हे आपण जाणताच! …तर मी तुम्हाला सांगत होतो, यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आलेल्या संरक्षण मंत्रिपदाच्या जबाबदारीबद्दल… चीनच्या विश्वासघातकी खेळीने भारत संकटात सापडला असता चव्हाणांनी आपल्या खांद्यावर आलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडली. चीन हा चीन असेल तर भारत ‘प्राचीन’ आहे… हे त्यांचे त्या वेळचे उद्गार माझ्या हृदयसिंहासनावर कोरले गेले आहेत. देश संकटात सापडला असताना आपले मुख्यमंत्री संकट निवारणार्थ संरक्षणमंत्री म्हणून जात आहेत या कृतज्ञ भावनेने महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी त्यांना १९ नोव्हेंबर १९६२ रोजी प्रेमादराने निरोप दिला. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव दोनही सभागृहात मांडण्यात आला. तो सत्ताधारी बाकांवरून नव्हे, तर विरोधी बाकांवरून. माझी ओळख देशाच्या संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण का आहे त्याचे कारण अशा अनेक प्रसंगांमध्ये दडलेले आहे. विधान परिषद या वरिष्ठ सभागृहात हा ठराव विरोधी पक्षनेते वा. ब. गोगटे (हिंदू महासभा) यांनी, तर विधानसभेत विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप (शेकाप) यांनी मांडला. विधान परिषदेमध्ये या अभिनंदन प्रस्तावावर बा. न. राजहंस, गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर, बी. एस. व्यास, प्रा. एन. डी. पाटील, कमलाबाई अजमेरा आणि सभापती वि. स. पागे यांची चव्हाणांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. विधानसभेत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मारोतराव कन्नमवार, डॉ. पी. व्ही. मंडलिक, कॉम्रेड पाटकर, पी. डी. रहांदळे, स. गो. बर्वे (अर्थमंत्री), आठल्ये गुरुजी आणि विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी यशवंतरावांनी हाती घेतलेल्या मोठ्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे, असे आश्वस्त केले. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीतील आणि विधान मंडळाच्या इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांपैकी हा एक संस्मरणीय सुवर्णक्षण होय. राष्ट्रीय पातळीवर या सुपुत्राने कर्तबगार संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि अर्थमंत्री अशी चारही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. ते काही काळ देशाचे उपपंतप्रधानही होते. चार महत्त्वाची आणि संवेदनशील खाती आपल्या कारकीर्दीत एकाच नेत्याने सांभाळल्याचे हे देशाच्या इतिहासातील महत्त्वाचे उदाहरण आहे. आपल्याला जर असे दुसरे उदाहरण सापडले तर मला जरूर कळवा. आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आपल्याला सांगताना विशेष आनंद होतो. ते देशाचे अर्थमंत्री असताना अर्थमंत्रालयाचे मुख्य सल्लागार होते डॉ. मनमोहन सिंग … जे पुढे देशाचे पंतप्रधान झाले. राजकारणातील व्यस्त दिनक्रमात चव्हाण साहेबांचे चौफेर वाचन, चिंतन आणि लेखन हे मी जवळून अनुभवले आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्य परंपरेचे ते वैभव आहे. त्यांनी नवोदित साहित्यिक, कवींना दिलेले प्रोत्साहन, त्यांच्याशी होणारा पत्ररुप आणि प्रत्यक्ष संवाद यातून रसिकाग्रणी म्हणून देखील त्यांची ओळख मला आणि तुम्हालादेखील आहे.

Share

-