युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये मध्यरात्री सर्च ऑपरेशन:बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलेले आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवर मध्यरात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. निवडणुकांचा प्रचार संपला असला तरी देखील मतदानादरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी समोर येत आहेत. त्यातच आता बारामती मधून श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सच्या शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारी नंतर ही कारवाई झाल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. मात्र नेमके या शोरूम मध्ये काय सापडले? कोणत्या कारणाने सर्च करण्यात आले? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. त्यावेळी देखील अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांना साथ दिली होती. आता विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शोरूम वर झालेल्या या धाडसत्रामुळे या प्रकरणाबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. युगेंद्र पवार यांचा विरोधकांवर आरोप विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सांगता सभा मोठ्या प्रमाणात पार पडली. या सभेला झालेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत, असा संशय युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. बारामतीत राजकारण या पातळीवर आले असेल तर ते दुर्दैवी असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. ही कारवाई राजकीय दबावातून झाली असल्याचा माझा आरोप नाही. मात्र महाराष्ट्रातील जनतेचे ते म्हणणे असल्याचा युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. कोण आहेत युगेंद्र पवार? युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा मेळावेही घेण्यात आले होते. यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.