मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का:’माफी असावी साहेब’ म्हणत अविनाश जाधव यांनी दिला राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव हे ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी समाज माध्यमाच्या मीडियातून पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी पत्र देखील राज ठाकरे यांना पाठवले आहे. माफी असावी साहेब, असे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांनी राजीनामा जरी दिला असला तरी अद्याप राज ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नसल्याचे कळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय देतात हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांच्याशी जाधव यांची लढत झाली होती. यात अविनाश जाधव यांनी 19 हजार मतांनी पराभव झाला होता. अविनाश जाधव यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. भाजपच्या संजय केळकर यांनी जाधव यांचा 1 लाख 20 हजारांहून अधिक मते मिळवत पराभव केला. याच सोबत त्यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा देखील पराभव केला. या निवडणुकीत अविनाश जाधव यांना केवल 42 हजार मते मिळाली होती. या निकालानंतर अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवरून निशाणा साधला होता. कोविडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी काम केले. गेली पाच वर्षे ते काम करत होते. मात्र, ही आमदार लोकांना 10-10 वर्षे भेटले नाहीत ते लाखांच्या फरकाने निवडून आले, हे कसे शक्य आहे? ईव्हीएमशिवाय हे शक्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती. पुढे अविनाश जाधव म्हणाले होते, विरोधी पक्ष एकत्र येऊनही काही होऊ शकत नाही. यंत्रणेने सीट आधीच सेट केल्या होत्या. भाजप विरोधात लाट दिसत होती. मात्र, त्यांनी चित्र तयार केले, लाडकी बहीण, कटेंगे तो बटेंगे, कारण त्यांना मोठ्या यशाला कारण पाहिजे होते, असे अविनाश जाधव म्हणाले होते.

Share