श्रीगोंद्यातील संवेदनशील गावांमध्ये ‘सीआरपीएफ’ पथकाकडून संचलन:गावागावातील शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्रात स्थानिक पोलिसांसह इतर सैनिक तुकड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संपूर्ण कार्यक्षेत्रातील संवेदनशील गावांमध्ये सीआरपीएफ.डी /१०७ या सैन्यांच्या तुकडीने हातात रायफल घेऊन विविध गावांत पथसंचलन केले. त्यात बेलवंडी, उक्कडगाव, ढवळगाव, देवदैठण, गव्हाणवाडी तसेच संवेदनशील असलेल्या सर्व गावांमध्ये जाऊन बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व सीआरपीएफ.डी /१०७ मधील सर्व कर्मचारी व सैनिकांनी रूट मार्च काढला. त्यामुळे परिसरातील समाजात तेढ निर्माण करणारे व अफवा पसरवणारे, तसेच गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोठी दहशत निर्माण झाली आहे. यावेळी हे पथसंचलन करण्यासाठी बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, उपनिरीक्षक मारुती कोळपे, तसेच इतर कर्मचारी व सीआरपीएफ.डी /१०७ बल गटाचे असिस्टेंड कमांडेड नंदी बाबू, इन्स्पेक्टर राजेश कुमार आदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथ संचलन करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत, गावागावातील शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, अन्यथा संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Share