मुंडे बहिण-भावाने धमकी देत जमीन बळकावली:पंकजा अन् धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांचा आरोप

दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. बहिण-भावाने संगनमताने धमक्या देत कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटले आहे. सारंगी महाजन म्हणाल्या की, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली परळीतील तालुक्यामधील जिरेवाडीच्या गटनंबर 240 मधील 36.50 आर जमिनीचा व्यवहार हा संगनमताने गोविंद बालाजी मुंडे याच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे केली. परस्पर व्यवहार केला सारंगी महाजन म्हणाल्या की, महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर व्यवहार ठरवून बोलावून घेतले व बोगस रजिस्ट्री करवून घेतली. सदर व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली होती. सदर जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड हायवेलगत आहे. यातील 27 आर जमीन शासनाने रस्ते विकास कामासाठी संपादित केली आहे. उर्वरित 36.50 आर जमिनीचा वरील व्यवहार असल्याचे त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले. ..तर परळी सोडू देणार नाही सारंगी महाजन म्हणाल्या की, परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले. याप्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दावा दाखल केला आहे. त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. 25 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Share