नागपूर विभागात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच:दोन महिन्यांत 61 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; 41 कुटुंबांनाच मदत मंजूर

नागपूर विभागात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील केवळ ४१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. उर्वरित २० प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ४० आत्महत्या झाल्या. या सर्व प्रकरणांना मदत मंजूर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६ आत्महत्या झाल्या असून सर्व प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. नागपूर जिल्ह्यातील तीनही प्रकरणे चौकशीधीन आहेत. गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रकरणांपैकी एक पात्र तर एक प्रलंबित आहे. भंडारा जिल्ह्यात या कालावधीत एकही आत्महत्या झाली नाही. गेल्या चार वर्षांत (२०२१-२०२४) नागपूर विभागात १,३७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ७०७ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. ६१४ प्रकरणे अपात्र ठरली. २४ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला होता. मात्र वास्तव वेगळेच आहे. सरकारकडून वीज बिल माफी, कर्जमाफी आणि विविध सवलती दिल्या जात आहेत. तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करण्याची मागणी होत आहे. विदर्भ हा प्रदेश शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो, ही वास्तविकता या आकडेवारीतून पुन्हा एकदा समोर आली आहे.

Share