मारकडवाडी गावातील गावकऱ्यांचा उठाव:याची देशपातळीवर चर्चा; ही लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचा नाना पटोलेंचा दावा

मतांचा अधिकार संपुष्ट आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी उठाव केला. तो उठाव पाहण्यासाठी मी येथे आलो असल्याचे ते म्हणाले. नाना पटोले यांनी मारकडवाडी गावात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार, पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग यांच्यावर टीका केली. भाजपच्या नेत्यांना सत्तेची गुरमी चढली असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. आम्ही जे आक्षेप घेतले, त्या आक्षेपाला उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. 76 लाख मते कशी वाढली? यावर आमचा आक्षेप असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. मॉकपोलला निवडणूक आयोग आणि पोलिसांचा विरोध का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. आता निवडणुका पुन्हा होणार नाही, मात्र लोकांची मते जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. मारकडवाडीच्या भूमिकेकडे आता देशाचे लक्ष लागले असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज केला जात आहे. तरुण आपला हक्क मागण्यासाठी जातात तर त्यांच्यावर देखील लाठीचार्ज केला जात आहे. ही हुकूमशाही आहे का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असे आदेश काढावे, त्यानंतर राजीनामा द्यायला आम्ही देखील तयार असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झाली आहे, हे सर्वांना माहिती आहे. 76 लाख मत कशी वाढली याचा हिशोब निवडणूक आयोग का देत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देशातील नागरिकांचे जे मत आहे, त्याचाच आवाज उठवण्याचा काम मारकडवाडी येथील लोकांनी केले आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या लढाईत सर्वांनी सामील व्हायला हवे, ही आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

Share