नांदेड परिक्षेत्रात चार जिल्हयात 38152 लिटर दारु गाळपाचे रसायन नाश:9216 लिटर गावठी दारुसह 22.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्हयात १९२ अधिकारी अन ६४७ पोलिस कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने १६९ ठिकाणी छापे टाकून ३८१५२ लिटर गावटी दारु गाळपासाठी लागणारे रसायन नाश केले आहे तर ९२१६ लिटर गावठी दारु जप्त असा २२.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १७३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहे. दारु वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार होऊ नये यासाठी नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ता. १० दारु अड्ड्यावर छापे टाकण्यात आले. यामध्ये हिंगोलीत पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, परभणीत रवींद्रसिंह परदेशी, नांदेडमध्ये अबिनाश कुमार, लातुरमध्ये सोमय मंुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९२ पोलिस अधिकारी व ६४७ पोलिस कर्मचाऱ्यांनी रविवारी दिवसभर छापासत्र चालविले. यामध्ये १६९ ठिकाणी छापे टाकले असून त्यात ३८१५२ लिटर गावठी दारु गाळपासाठी तयार केलेले रसायन जप्त करून नाश करण्यात आले. तसेच ९२१६ लिटर गावठी दारु, ३४४६ क्विंटल देशीदारुच्या बाटल्या, ५४ बॉटल विदेशीदारु तर २०० लिटर सिंदीची दारु असा २२.५९ लाख रुपयांचा मुद्ेदमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १७३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हयात २४ ठिकाणी छापे टाकून ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नांदेड जिल्हयात ३५ ठिकाणी छापे टाकून ६.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ३७ जणांवर गुन्हे दाखल झाले. परभणी जिल्हयात ४३ ठिकाणी छापे टाकून ४.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ४३ जणांवर गुन्हे दाखल झाले. लातुर जिल्हयात ६७ ठिकाणी छापे टाकून ७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ६७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Share