नांदेड जिल्ह्यात 212 दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे:1978 लिटर गावठी दारुसह 8.58 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रांतर्गत चार जिल्हयातून पोलिस विभागाच्या पथकाने रविवारी ता. २० एकाच दिवसात बेकायदेशीर दारु अड्ड्यांविरुध्द कारवाई हाती घेत २१२ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये पाच हजार लिटर रसायन, १९७८ लिटर गावठी दारुसह ८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी २२० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड परिक्षेत्रात नांदेडसह हिंगोली, परभणी, लातुर या जिल्हयांचा समावेश आहे. या जिल्हयांमधून सध्या विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता सुरु असून या कालावधीत दारु गाळप करून वाटपाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस विभागाने धडक मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे (हिंगोली), अबिनाश कुमार (नांदेड), रविंद्रसिंह परदेशी (परभणी), सोमय मुंडे (लातुर) यांच्या मार्गदर्शनाखाली चार जिल्हयात आज सकाळ पासून दारु अड्यावर छापा सत्र सुरु करण्यात आले होते. नांदेड परिक्षेत्रात पाच अप्पर पोलिस अधिक्षक, १६ उपाधिक्षक, १६८ अधिकारी व ५४६ कर्मचाऱ्यांनी २१२ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये १९७८ लिटर गावठी दारु, ५००० लिटर गावठी दारु गाळपासाठी लागणारे रसायन, २९२२ देशीदारुच्या बाटल्या तर ४६ विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या मुद्देमालाची किंमत ८.५८ लाख रुपये असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, हिंगोली जिल्हयात २१ ठिकाणी छापे टाकून १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ५७ ठिकाणी छापे टाकून १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ५८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. परभणी जिल्ह्यात ४८ ठिकाणी छापे टाकून २.०३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ४९ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. लातुर जिल्हयात ८६ ठिकाणी छापे टाकून ३.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ८७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून यापुढेही हि मोहिम सुरु राहणार आहे. नागरीकांनी त्यांच्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती पोलिस विभागाला देण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

-