नांदेडमध्ये महायुतीला धक्का:माजी आमदार सुभाष साबणेंचा भाजपला रामराम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला मोठा धक्का बसला आहे. नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देत स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. सुभाष साबणे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश झाल्याने आता महाराष्ट्रातील तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. सुभाष साबणे यांनी दोन वर्षांपूर्वीच शिवसेना पक्षातून भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी देगलूर-बिलोली मतदारसंघातून पोटनिवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली. या निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा विजय झाला होता. रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने येथील मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. सुभाष साबणे यांनी 1999, 2004, 2014 या निवडणुकीत तीन वेळा शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते. सुभाष साबणे यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजप पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा होती. जितेश अंतापूरकर यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने साबणे यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. शनिवारी सुभाष साबणे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लाडकी बहीण योजना समिती अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या तिन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यावर सुभाष साबणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले. मात्र, ज्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे काम केले नाही, त्याला भाजपमध्ये घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील दिली जाते, असे म्हणत त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

Share

-