नारायण गडावरील मेळाव्यास बार्शीतून हजारो बांधव जाणार:यमाई देवीला मराठा आराक्षणासाठी साकडे‎

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील यमाई देवीला बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (ता.८) महाआरती करत मेळावा यशस्वीतेसाठी साकडे घालण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुका अध्यक्ष तथा मराठा आंदोलक आनंद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये मराठा समाजाच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने कोरेगाव येथील बैठकीमध्ये उपळाई ठोंगे व आगळगाव विभागातून जास्तीत जास्त समाजबांधव नारायण गडावरील दसरा महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार असा निर्धार यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केला. यावेळी आनंद काशीद यांनी मराठा समाजाला आता आपली एकी कायम ठेवत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटलांच्या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी जरांगेच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन केले. तसेच नारायण गडावरील शनीवारी (ता.१२) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी मराठा समाज बांधवांसह वंजारी लिंगायत धनगर समाज बांधव देखील या बैठकीला उपस्थित होते.

Share

-