नरेंद्र मोदींवर दुसऱ्या फाळणीचा ठपका ठेवला जाईल:मंत्री नीतेश राणेंच्या वक्तव्यावरुन राऊत संतापले; म्हणाले- पंतप्रधानांना पत्र पाठवणार
काही लोकांना या देशात दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे ते वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका केली. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत. तसेच तुमच्या लोकांना आवरा नसता, तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका ठेवला जाईल, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. नितेश राणे यांना आधी इतिहास समजून घ्यावा लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई ही मुलांविरुद्ध नाही तर चंद्रराव मोरे यांच्याविरुद्ध केली होती. या मोरे यांचे वंशज काही मंत्रिमंडळात असतील, अशा शब्दात राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे. इतिहास बदलण्याची प्रक्रिया ही घातक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक कोण होते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मात्र जे शाळेतच गेले नाही, त्यांनी इतिहास शिकला नाही. त्यांना केवळ मटणाचे दुकान दिसते. त्यांना पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत. ज्यांना पुन्हा एकदा हा देश फाळणीकडे ढकलायचा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या लोकांना समज देण्याची मागणी आपण त्यात करणार आहे नसता तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका ठेवला जाईल, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. सर्व काही नीट चाललेले असताना स्थिरस्थावर चाललेले असताना, या देशात पुन्हा एकदा फाळणीची बीजे रोवण्याचे काम मोदींची पिलावळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मोदींना हा देश अफगाणिस्तान करायचा की हिंदू पाकिस्तान करायचा? वीर सावरकर हे विज्ञानवादी आणि आधुनिक हिंदु होते. त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सारखे होते. मात्र, कोणाला शेणातच लोळायचे असेल तर त्यात आम्ही काही करणार? हा देश पुन्हा एकदा अज्ञानाकडे ढकलला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हे केवळ एका राजकीय स्वार्थासाठी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांना हा देश अफगाणिस्तान करायचा की हिंदू पाकिस्तान करायचा? हे नरेंद्र मोदी यांनी ठरवायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.