इंद्रगढी शाळेच्या विद्यार्थ्यांची निसर्ग सहलीत स्वच्छता मोहीम

इंद्रगढी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त बुधवारी घाटनांद्रा येथील परिसरात असलेल्या निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. यादरम्यान आयोजित एकदिवसीय निसर्ग सहलीचा आनंद घेतला. इंद्रगढी व जोगेश्वरी मंदिर परिसरात व गडावर विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेतून विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी या परिसरात असलेल्या निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या येथील सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवा या विषयांवर भाषणे दिली,तर निसर्ग वाचवा हे मूकनाट्य देखील सादर करून येथील प्रेक्षकांची दाद मिळवली. शिक्षक संदीप पिवळ यांनी जंगलाविषयीची माहिती दिली. तसेच जंगलामध्ये कोणकोणती झाडे असतात, कोणते प्राणी राहतात यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व निसर्ग वाचवण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक वनभोजनाचा आनंद घेतला. सर्व मित्र-मैत्रिणीच्या आठवणीत राहील अशी ही एकदिवसीय निसर्ग सहल उत्साहात पार पडली. सहलीच्या यशस्वितेसाठी शाळेचे संदीप मोरे,अविनाश देशमुख, विजय साबदे, संदीप पिवळ, सविता पवार, रुपाली पाटील आदींनी परिश्रम घेतले. यादरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी खास मार्गदर्शनही केले. माती संकलन आणि संवर्धनचे महत्त्व शाळेच्या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम स्काऊट गाईड पथकाने ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत माती संकलन व माती संवर्धन कार्यक्रम सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील इंद्रगढी देवी मंदिर व जोगेश्वरी देवी मंदिर परिसरात विषेश कार्यक्रम घेण्यात आला .त्यानंतर विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य वातावरणाचा पुरेपूर आनंद घेऊन नृत्य, निसर्ग गीत, विविध नाटकेही सादर केली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यर्थिनीने गीतगायन सादर करून आपल्या आवाजाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

Share

-