NCP शरद पवार गट सरकारविरोधात आक्रमक:पुण्यात महागाई, बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर प्रतिकात्मक होळी पेटवली
देशातील सर्वसामान्य नागरिक महागाई व बेरोजगारी या संकटांसोबत धीराने लढत आहेत.परंतु या सोबतच कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. यासर्व परिस्थितीवर निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पुण्यात प्रतिकात्मक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी होळीमध्ये वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर,नराधम दत्ता गाडे यांच्या प्रतिमा होळीत दहन करण्यात केल्या. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत गैरकारभाराची मालिका महायुतीच्या सरकारमध्ये सुरू आहे.देशपातळीवर असलेली आर्थिक संकटे, महागाई बेरोजगारी तर राज्यभरात असलेले सुरू असलेली दडपशाही, गुंडशाही, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे वाचाळवीर या सगळ्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणूस आपल्या मेहनतीने कष्ट करून आपले जीवनमान जगत असताना त्याला सुरक्षा देण्याचे काम सुद्धा सरकार करू शकत नसेल तर हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. आज महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. आपल्या पुण्यनगरीमध्ये स्वारगेट अत्याचार यासारखी दुर्दैवी घटना, बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या ,कोणीतरी एक नराधम हव्या त्या माणसाचा जीव देऊ शकेल इतकी ताकद निर्माण करू शकतो आणि या राज्याची व्यवस्था त्याला संरक्षण पुरवते. राज्याचे सामाजिक परिस्थिती व कायदा व सुव्यवस्था किती घासरली आहे याची ही ज्वलंत उदाहरणे आहेत. आपल्या महापुरुषांनी आपल्या बलिदानातून भूमीला स्वराज्य सन्मानाने स्वाभिमान मिळवून दिला, त्या महापुरुषांबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या औलादी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या रूपाने आपल्या राज्यात आहेत,यांना देखील शासनाच्या व्यक्तीने स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते हे देखील चुकीचे आहे. या पुण्यनगरीमध्ये वाहतूक व्यवस्था देखील अत्यंत ढासळली आहे. शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात जायला तासन् तास ट्राफिक मध्ये अडकावे लागते याचा थेट परिणाम या भागातील उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्यामध्ये होत आहे. हे चित्र देखील सामाजिक अस्थिरतेच्या दृष्टीने आपला प्रवास सुरू असल्याचे द्योतक आहे. अशा या सर्व परिस्थितीमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आजची ही प्रतिकात्मक होळी केली आहे. भविष्यात जर सरकारला वेळीच जाग आली नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची कार्यकर्त्याची तयारी आहे असे देखील जगताप म्हणाले. या प्रतीकात्मक होळी प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, दिपक कामठे,रोहन पायगुडे, पायल चव्हाण,रचना ससाणे,जयदीप देवकुळे, मधुकर भगत राजश्री पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.