जिल्हास्तरीय प्रशिक्षणात नवनियुक्त शिक्षकांनी गिरवले शिक्षणाचे बारकावे:पवित्र पोर्टल अंतर्गत नियुक्त झालेल्या 137 शिक्षकांचा सहभाग‎

राज्य शासनामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांवर नुकतेच पवित्र पोर्टल अंतर्गत हजारो प्रशिक्षित तरुण तरुणींना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. या भरती प्रक्रियेनंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे नवनियुक्त शिक्षकांसाठी ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यान सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. औपचारिक प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत ५० तासांचे प्रशिक्षण सोमवारी (दि. ११) उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणात शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, बहुवर्ग अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन, शिक्षण हक्क अधिनियम, सामाजिक न्याय व समता, माहिती तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्ये, नवोपक्रम, कृती संशोधन, ताणतणाव व्यवस्थापन, वातावरणातील बदल, विद्यार्थी लाभाच्या योजना, मुलींचे शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरण, शालेय अभिलेख, अध्यापनात स्थानिक भाषेचा वापर, व्यावसायिक अध्ययन समूह या विषयांचा समावेश होता. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी निशिकांत दाळू, सतीश मनोहर, रवींद्र काळबांडे, कविता उघडे, पंकज भांबुरकर, अरुण नेवारे, अमोल गजभिये आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडेंच्या नेतृत्वात ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रेमला खरटमोल, डॉ. विजय शिंदे, पवन मानकर, अधिव्याख्याता डॉ. राम सोनारे, डॉ. दीपक चांदुरे, डॉ. विकास गावंडे, सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रशांत डवरे, संजीवकुमार खाडे, अनिल पंजाबी, श्रीनाथ वानखडे, अमोल वऱ्हेकर, अतुल पडोळे, मीनाक्षी खरटमोल, वैशाली शिरभाते, कांचन दुधे, छाया मिरासे, मनीष दिघेकर, राजेश वरकडे, गजानन मानकर आदी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. भावी पिढीचे नवनिर्माते शिक्षक ही केवळ पदवी नाही, तर ती एक सेवा आहे. शिक्षक हे भावी पिढीला घडवण्याचे कार्य करत असल्याने समाजाचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टीकोन आदराचा असल्याचे, मत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील सेवापूर्व व बालशिक्षण विभाग प्रमुख माधुरी सावरकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

Share