मी अदानीच नव्हे तर अनेक उद्योगपतींच्या घरी जातो:शरद पवारांचे अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर; आरोपांत तथ्य नसल्याचा दावा
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये आणण्यासाठी गौतम अदानी यांच्या घरी बैठक झाली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. या बैठकीला अमित शहा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मी देखील उपस्थित होतो, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी घडलेल्या घडामोडीत बाबत अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले का? प्रत्यक्षात तसे घडले का? असे प्रश्न शरद पवार यांनी विचारले आहेत. तसे घडलेले नसताना असे प्रश्न का काढायचे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात एका वृत्त वाहिनीला बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांचे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर मी गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योजकांच्या घरी जातो. रतन टाटा असो किंवा किर्लोस्कर अनेकांच्या घरी मी जात असतो. अदानी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आणखी काही प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याचा अदानी यांचा विचार आहे. महाराष्ट्रात त्यांची गुंतवणूक जेव्हा झाली त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. गोंदिया भंडारा परिसरात त्यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील मी केले होते. त्या भागात कोळशाच्या खानी विकसित करण्याचा त्यांचा विचार होता. त्यांना ते काम दिले गेले, त्यावेळी केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नव्हते, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात. त्यानुसार मी त्यांना भेटलो असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार जे सांगत आहेत त्यात सत्य नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. निवडणुकीचा कालावधी सोडला तर केंद्रातील मंत्री असो, उद्योजक असो या सर्वांना मी भेटत असतो. अनेक वेळा अजित पवार यांना सोबत घेऊन अनेकांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. जेणेकरून त्यांना माहिती व्हावी, त्यांना कळवे, यासाठी मी असे करत होतो. अमित शहा या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना एकदा नव्हे तर तीन-चार वेळा मी भेटलो. कधी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे शिष्टमंडळ घेऊन देखील भेटलो. त्यांना त्यांच्या घरी देखील जाऊन भेटलो. मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. त्यामुळे राज्याचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी मंत्र्यांची भेट घेणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे, हे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. एकीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने गौतम अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख करून भारतीय जनता पक्षावर टीका होत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र अदानी यांच्या सोबत संबंधाबाबत उघडपणे स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई शहर हे अदानी यांच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत. धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई अदानी समूहाला देण्यात आली असल्याची टीका ठाकरे गट करत आहेत.