एकीकडे विजयादशमीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा अंदाज:राज्यातील राजकीय मेळावे कसे पार पडणार? याविषयी साशंकता

नवरात्रीच्या आखेच्या दिवशी एकीकडे विजयादशमी साजरी करण्यात येत असताना दुसरीकडे हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या राजकीय मेळाव्यांवर देखील पावसाचे सावट आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसह काही जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडीप देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात आज होणाऱ्या राजकीय मेळाव्या दरम्यान वरूण राजा आपली कृपादृष्टी दाखवतो का? हे पाहावे लागेल. राज्यातील कोकण, गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टी भागामध्ये १३ ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 12 ऑक्टोबर पर्यंत सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये 11 ते 13 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय मेळावे कसे पार पडणार? याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात देखील ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अत्यल्प पावसाची शक्यता – हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे राज्यात 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत बहुतांश भागात पावसाची उघडीप असेल. विदर्भात 13 ते 15 ऑक्टोबर असे 3 दिवस केवळ ढगाळ वातावरण आणि अगदीच तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, जालना, नांदेड, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत उघडीप असेल. पाऊस परतला असे म्हणता येणार नाही पाऊस चार ते पाच दिवस उघडीप देणार असल्याने शेतात वाफसा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची भीती न बाळगता शेतीची कामे उरकण्यास हरकत नाही. राज्यात 17 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाळी वातावरण होण्याचा अंदाज आहे. परतीचा मान्सून अजूनही राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबारपर्यंत येऊन थबकलेला आहे. वाटचालीस अनुकूल वातावरण असले तरी प्रत्यक्षात तो प्रवाही होत नाही तोपर्यंत पाऊस पूर्ण परतला असे म्हणता येणार नसल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या वातावरणानुसार राज्यात काही ठिकाणी गारपीट होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात तसे हवामान बदल दृष्टिपथात नसल्याचे खुळे यांनी सांगितले.

Share

-