‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत मलाई खाल्ली:आदित्य ठाकरेंचा दीपक केसरकरांवर आरोप, तुमच्यामुळे शिवसेना तळागाळाला गेली – केसरकर

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने गतवर्षी ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. या योजनेत तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी मलाई खाल्ली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर या आरोपावरून दीपक केसरकर यांनीही आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंनी उपकार विसरू नयेत, असा हल्लाबोल केसरकर यांनी केला. सरकारने गतवर्षी आणलेल्या ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. पण गणवेशांचा निकृष्ट दर्जा व कमी-जास्त मोजमाप यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने या योजनेत बदल केले आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर उपरोक्त आरोप केला. काय म्हणाले आदित्य ठाकरे?
एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम जो मिंदे सरकार राबवणार होते, तो निर्णय या सरकारने बंद केला. मग आता त्या मंत्र्याची चौकशी होणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश देखील सोडला नाही, त्यात देखील मलई खाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. दीपक केसरकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला. गणवेशाचे कंत्राट 138 कोटीचे होते, ते 11 कोटी रुपये कमी करण्यात आले. आदित्य ठाकरेंनी निदान माझ्यावर तरी आरोप करायला नको होते. आज जी शिवसेना तळागाळाला जात आहे, त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे. आदित्य ठाकरे यांनी वडीलांवर दबाव आणून काँग्रेससोबत जायला भाग पाडले, असा घणाघात दीपक केसरकरांनी केला. राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली होती, लोक त्यांना हॉटेल देत नव्हते, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आदित्य ठाकरेंनी हे उपकार विसरू नये, अशी आठवणही दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना करुन दिली. हे ही वाचा… ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत मोठा बदल:विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी करता येणार; केसरकर सरकारवर संतापले सरकारी शाळांमधील शालेय गणवेशाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने गतवर्षी या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य, एक गणवेश ही योजना आणली होती. त्यात सरकारने विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः घेतली होती. पण गणवेशांचा निकृष्ट दर्जा व कमी-जास्त मोजमाप यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद टाळण्यासाठी आता सरकारने या योजनेत मोठा बदल करत ही जबाबदारी स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे. सविस्तर वाचा…

Share