विरोधकांनी अल्पसंख्याक समाजाचा मतदानापुरता वापर केला:सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप खोटा – पाशा पटेल
राज्याचे पुढील सरकार महायुतीचेच असणार असून महायुती सरकारच सर्व समान्यांना न्याय देऊ शकते, असा दावा कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी रात्री गोरेगाव येथील प्रचार सभेत केला आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, उमेदवार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, डॉ. रवी पाटील गोरेगावकर, कैलास काबरा, ॲड. पी. आर. भाकरे, नारायण खेडकर, के. के. शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पटेल म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्व समान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, महिला, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी विविध योजना हाती घेतल्या असून या योजनांचा गावपातळीवर लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शेती सिंचनासाठी विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सौरपंपाची योजना हाती घेतली. यामुळे कृषी पंपाला दिवसा वीज मिळून दिवसा सिंचन करता येत आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाचा केवळ मतदानापुरता वापर करून घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सोयाबीनचे दर कमी का आहेत, सांगितले कारण
देशासह राज्यात सोयाबीनचे दर कमी होत असल्याचे कारण सांगतांना त्यांनी मका व तांदूळ या पिकाचे डीओसी पावडर कमी किंमतीत मिळत आहे. त्यातुलनेत सोयाबीनच्या डीओसी पावडरची मागणी कमी असल्याने सोयाबीनचे दर कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षांत विविध विकास कामे केली
राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात महायुतीने रस्ते, पिण्याचे पाणी यासह विविध विकास कामे केली आहेत. या निवडणुकीतही महायुतीला मोठे यश मिळणार असून पुढील सरकार महायुतीचेच असेल असा दावाही त्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार तथा उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांनीही मार्गदर्शन केले. या भागाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.