या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली:एवढे क्रौर्य कुठून आले, कुठल्या दिशेने चाललो आहोत आपण? छगन भुजबळांचा सभागृहात सवाल
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत केले आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुन्हेगारीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुन्हेगारीवर देखील भाष्य करताना हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ म्हणाले, मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत, खरेतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यंत्राचा, तंत्राचा, मंत्राचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो. संतांचा हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांपासून तुकरमांपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते संभाजी महाराजांचे पोवाडे आपण गातो, तो आपला हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली. बीडचे प्रकरण पहावत नाही काही महिन्यातले काही प्रकरणे आहेत. बीडचे प्रकरण संतोष देशमुख, ते तर पहावत नाही. त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला, जी काही कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे. परभणीमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे जे आहे तिथे असलेले संविधान, त्या संविधानाची मोडतोड केली, कोणी तरी केली म्हणून आंदोलन झाले. त्यात ज्याला पकडण्यात आले, सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो गृहस्थ आहे. तो पोलिस कस्टडीत मृत्यू पावला. त्याची आपण चौकशी करणार नाही? आणि मला आश्चर्य याचे वाटते की बीडच्या प्रकरणात जे आवाज उठवत होते ते म्हणतात जाऊद्या ते परभणीचे प्रकरण आपण त्यांना जाऊ देऊ. त्यांना माफ करा. पण का? ते माणसं नाहीत? तो मागासवर्गीय आहे म्हणून? दलित समाजाचा आहे म्हणून? माणूस माणूस आहे न? संविधान सगळ्यांसाठी सारखे आहे न? हा महाराष्ट्रा माझा पण आहे मग आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. कुठे चालला आहे महाराष्ट्र? पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पुढची गोष्ट लातूरला प्रेम प्रकरणातून एका धनगर समाजच्या मुलाची नखे काढण्यात आली, त्याचा मृत्यू झाला. आपण कोणी बोलणार नाही? दलित समाजाचा आहे म्हणून? हा महाराष्ट्र कुठे चालला आहे? जालन्यातले प्रकरण कैलास बोराडे, अन्वा भोकरदनचा तो शिव मंदिरात गेला म्हणून कोणी म्हणते जमिनीचा वाद होता म्हणून काहीही असेल, अरे धनगराचा तो मोणूस. अहिल्याबाई होळकर यांना पिंड घेऊन आपण दाखवतो, त्या समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीने मारले आहे, कोळसे पेटवून त्यात लोखंडी रॉड गरम करून चटके देण्यात आले. त्याच्या गुद्वारामध्ये गरम सळई घुसवण्यात आली. धनगराचा माणूस आहे, आपण बोलायचे नाही? कोण करणार याचा निषेध? मला सरकारला दोष द्यायचा नाही, पोलिसांना दोष द्यायचा नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की कुठे चालला आहे महाराष्ट्र? महाराष्ट्रात एवढे क्रौर्य कुठून आले? या महाराष्ट्रात एवढे क्रौर्य कुठून आले? काय आहे याच्या पाठीमागे? कोणत्या शक्त्या आहेत? याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? आपण फक्त आरोप करणार, प्रश्नांची उत्तरे देणार आणि निघून जाणार. बस एवढेच काम आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक गोरगरीब या सभेकडे डोळे लाऊन पाहतो की आम्हाला न्याय मिळेल. पण प्रश्न न्यायचा तोही नंतर पाहू. पण हे का होत आहे हे आपण पाहणार नाहीत? पक्षाचे जे नेते असतील त्या प्रभागातले, पत्रकार असतील काही लेखक असतील, काही विद्वान मंडळी असतील त्यांना बोलवा, सगळ्यांना एकत्र बसवा. हा राजकारणाचा प्रश्न नाही, हा विकासकामाचा प्रश्न नाही. या महाराष्ट्रातले जे क्रौर्य आहे हे कशा प्रकारे आपण थांबवणार आहोत, हे का निर्माण झाले? कधीपासून निर्माण झाले? कुठल्या भागात हे विषय वाढीला लागले आहेत? यावर चर्चा केली पाहिजे. माणूसच जनावरासारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा? आपण औरंजेबाचा निषेध केला, करायलाच पाहिजे. पण हा औरंगजेबीपणा या महाराष्ट्रात परत कसाकाय आला. बर हा एकच माणूस आहे का? कोळसे जमावणारे, कोळसे पेटवणारे, त्याला मारणारे, त्याला पालथे पाडणारे हे सगळे किती आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विकास तर करायलाच पाहिजे. अमर्त्यसेन पण म्हणाले आहेत विकासाला माणसाचा चेहरा असला पाहिजे. पण माणूसच जनावरासारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा? असा सवाल छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केला.